परभणी : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

जिंतूर-जालना महामार्गावरील मालेगाव पाटीजवळ अपघात
जिंतूर-जालना महामार्गावरील मालेगाव पाटीजवळ अपघात

जिंतूर : पुढारी वृत्तसेवा – जिंतूर-जालना महामार्गावरील मालेगाव पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला. सोबत असलेली सात वर्षाची चिमुकली जखमी झाली आहे. हा अपघात बुधवारी दि. ७ रोजी संध्याकाळी ६ .३० च्या सुमारास घडला. या अपघातात दुसरा दुचाकीस्वार आपले वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला आहे.

अधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील वाई येथील अर्जुनराव किसनराव दौंड (वय ६०) ही त्यांची नात ईश्वरी भगवान दौंड (वय ७) ही आजारी असल्यामुळे दुचाकी (क्रमांक एमएच २२ ए.ई.८३२९) वरून जिंतूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करून वाई गावाकडे जात होते.

दरम्यान, समोरून येणारी दुचाकी (क्रमांक एमएच २० ए. ई. ३७४१) या दोन्ही वाहनांची मालेगाव पाटीजवळ समोरासमोर धडक झाली. या घटनेची माहिती महामार्गावरील काही युवकांनी १०८ रूग्णवाहिकेला दिल्यानंतर रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नागेस आकात यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे तात्काळ दाखल केले.

या अपघातात अर्जुनराव किसनराव दौंड (वय ६० रा. वाई) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर ईश्वरी भगवान दौंड या मुलीवर जिंतूर रूग्णालयात डॉ. अनिफ खान तसेच परिचारिका मते, जवळे यांनी प्राथमिक उपचार केले. अपघाताची माहिती जिंतूर पोलीसांना मिळाल्यानंतर स.पो. नि. पोमनाळकर, पो.उप. नि.खोले, गोपीनाथ कोरके, पोलिस जमादार शंकर हाके, संतोष पैठणे, पो. कॉ. रिठ्ठे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news