Gujarat Election Results : गुजरात निवडणुकीत भाजपने मोडला काँग्रेसचा ‘हा’ मोठा विक्रम | पुढारी

Gujarat Election Results : गुजरात निवडणुकीत भाजपने मोडला काँग्रेसचा 'हा' मोठा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात २७ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election Results) भाजपने सातव्यांदा बहुमत सिद्ध केले आहे. तर काँग्रेस आणि आपला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपने १५७ जागांवर आघाडी घेत विक्रमी बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर काँग्रेस केवळ १६ जागांवर तर आप ५ जागांवर आघाडीवर आहे. गुजरात विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. १९८५ मध्ये काँग्रेसने १४९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने हा विक्रम मोडीत काढत १५७ जागांवर आघाडी घेतली आहे.

निवडणूक आयोगाच्या दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार (Gujarat Election Results) भाजपला आतापर्यंत ५३ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला २७ टक्के आणि आपला १३ टक्के मते मिळाली आहेत. १९९५ पासून गुजरातमध्ये भाजपला कोणी हरवू शकलेला नाही. २०१७ मध्ये भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपने विक्रमी बहुमत मिळवले आहे. भाजप सलग सातव्‍यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थानावर विराजमान होत आहे. अभूतपूर्व विजयाकडे भाजपची वाटचाल सुरु आहे. या विजयाचे शिल्‍पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेतच. त्याचबरोबर निवडणूक रणनीतीमध्‍ये भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देण्‍यात गुजरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील (सी. आर. पाटील) यांचे मोठे योगदान राहिले आहे.

भुपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या घाटलोडियामधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ च्या गुजरात निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेसच्या रमेशभाई पटेल यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर आनंदीबेन गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. तर २०१७ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत भुराभाई यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर पटेल मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. सध्याच्या निवडणुकीत भाजपने या जागेवरून विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसच्या अमी याज्ञनिक आणि आम आदमी पक्षाचे विजय पटेल यांच्याशी झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button