औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
शहरात वाढत्या नशेच्या पदार्थांची विक्री पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गुन्हेगारी वाढल्याने आणि खासदार इम्तियाज जलील यांनी नशेच्या पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. असे निवेदन दिल्याने पोलीस आयुक्तांनी शहरात NDPS स्पेशल ऑपरेशन सेल कार्यान्वित केला आहे. १८ मे रोजी याबाबत तसे आदेश देण्यात आले आहेत.
या पथकात एक सहायक पोलिस निरीक्षक, एक सहायक उपनिरीक्षक, दोन पोलीस नाईक, दोन पुरुष पोलीस शिपाई आणि एक महिला पोलीस शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करेल. सिटी चौक ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक मोहसीन सय्यद, सातारा ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, सय्यद शकील, पोलीस शिपाई धर्मा गायकवाड, आनंद वाहुळ आणि प्राजक्ता वाघमारे यांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना तत्काळ मोकळीक द्यावी, असे आदेश उपायुक्त अपर्णा गीते यांनी संबंधित प्रमुखांना दिले आहेत.
हे पथक अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, गुंगीकारक औषधींची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करतील. हे पथक गुन्हे शाखेच्या अंतर्गत काम करेल, असे आदेशात म्हटले आहे.