बेताल इम्रान! | पुढारी

बेताल इम्रान!

सत्ता गमावल्याने वेडेपिसे झालेले सत्ताधीश जगभरात पाहायला मिळतात. त्यामध्ये आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचीही भर पडली आहे. संसदेतील बहुमत गमावल्यानंतर विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यापासूनच इम्रान खान तोल गेल्यासारखे वागू लागले आहेत. अविश्वास ठराव आणला तेव्हा, ‘मी खेळाडू आहे आणि राजीनामा देऊन पळून जाण्याऐवजी अखेरच्या चेंडूपर्यंत खेळत राहणार आहे’ अशी भाषा ते करू लागले तेव्हा अनेकांना त्यांच्या धीरोदात्तपणाचे आणि लढवय्या वृत्तीचेही कौतुक वाटले असावे.

परंतु, त्यांची ही वक्तव्ये म्हणजे निव्वळ ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असल्याचे काही दिवसांत स्पष्ट झाले. लष्कराशी संबंध बिघडल्यापासून इम्रान सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले होते. त्यातच त्यांना पक्षांतर्गत झटके बसले. त्यांच्या पक्षातील खासदार बाहेर पडले आणि त्यांच्या सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षांनीही पाठिंबा काढून घेतला. हा सगळा घटनाक्रम घडत असताना इम्रान एकटे पडल्याचे आणि त्यांनी बहुमत गमावल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

परंतु, ती वस्तुस्थिती पचवणे त्यांना जड जात होते. त्यामुळेच सत्तेचा गैरवापर करण्याबरोबरच ते घटनाबाह्य वर्तन करीत होते. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याचा सामना न करता उपसभापतींकरवी तो ठरावच घटनाबाह्य ठरवून त्यांनी संसद बरखास्त केली आणि निवडणुकांची घोषणा केली. अखेरच्या चेंडूपर्यंत खेळण्याची भाषा हवेत विरून गेली. संसदेचे उपसभापती कासीम सुरी यांनी इम्रान सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संविधानाच्या आणि नियमांच्या विरोधात असल्याचे कारण देऊन फेटाळला. इम्रान यांच्याच पक्षाचे उपसभापती असल्यामुळे आपल्या सरकारची भूमिका त्यांनी निष्ठापूर्वक वठवली होती. त्यावेळी इम्रान यांनी अत्यंत नाटकी भाषण करून शोभा करून घेतली होती.

अविश्वास ठराव फेटाळून लावल्याबद्दल त्यांनी जनतेचे अभिनंदन केले होते. सरकार पाडण्याचा प्रयत्न आणि परदेशी षड्यंत्र उपसभापतींनी उधळून लावल्याचे सांगताना अविश्वास प्रस्तावामागे परदेशी शक्तींची फूस असल्याचा आरोप केला होता आणि देशवासीयांना निवडणुकांना तयार राहण्याचे आवाहन केले होते. अशावेळी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या रडीच्या डावाला चाप बसवला आणि शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांचे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यातून त्यांची पुरती शोभा होत आहे. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठीच की, इम्रान आता बेताल झाले आहेत. पुढील निवडणुकांच्या तयारीला लागले असताना कोणताही मुद्दा वेशीला नेऊन टांगण्याचा निरर्थक प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

शाहबाज शरीफ यांचे सरकार दीडेक वर्षेच राहणार आहे. त्यानंतर इम्रान यांना ज्याची ओढ लागली आहे त्या निवडणुका होतील; परंतु त्यांना धीर धरवत नाही. त्यांच्याच काळात महागाई आभाळाला भिडली आणि सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यात आलेले स्पष्ट अपयश आणि त्यातून उफाळलेल्या जनतेच्या रोषातूनच त्यांना सत्ताच्युत व्हावे लागले. भारताविरोधातील गरळ ते ओकत होतेच, हा भाग वेगळा. पाकिस्तानची जनता आजही सोबत असल्याच्या भ्रमात ते आहेत. त्यासाठी ते विरोधकांवर अमेरिकेचे हस्तक असल्याचा आरोप करीत सुटले आहेत.

आपल्यावरील राजकीय संकटामागे अमेरिका असल्याचा थेट आरोप त्यांनी त्यांच्या सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या घडामोडींवेळीही केला होता. रशिया आणि चीनच्या विरोधातील वैश्विक मुद्द्यांवर पाकिस्तान अमेरिकेसोबत नाही. त्यामुळे अमेरिकेने देशातील विरोधकांना हाताशी धरून आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचल्याचा आरोप ते करीत होते आणि आताही तेच तुणतुणे वाजवत त्यांनी देशभर सभांचा धडाका लावला आहे. फैसलाबाद येथे झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी तोच सूर लावला.

अमेरिकेने थेट हल्ला न करता पाकिस्तानला गुलाम बनवल्याचा आरोप ते करीत आहेत. सत्तेवर येऊन काही आठवडे झालेले शाहबाज शरीफ यांचे सरकार भ्रष्ट तसेच देशद्रोही असल्याचा आणि ते विदेशातून आयात केले असल्याचा त्यांचा आरोप आहे. जगातल्या कुठल्याही देशातला विरोधी नेता सत्ताधार्‍यांवर असे आरोप करू शकतो. कारण, त्यासाठी पुरावे द्यावे लागत नाहीत आणि काही सिद्धही करावे लागत नाही. त्याअर्थाने हा सगळ्यात सोपा मार्ग असतो आणि त्यांनी तोच निवडला आहे. काश्मीर प्रश्न हा पाकिस्तानच्या जनतेला चिथावणी देण्याचा आणखी एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे इम्रान त्यासंदर्भातही बडबड करीत राहतात.

पाकिस्तानने काश्मीर विसरून जावे आणि भारताची कायम गुलामी करावी, अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे ते सांगतात. काश्मीर केंद्रित राजकारण करून पाकिस्तानच्या जनतेची सहानुभूती मिळवण्याचे त्यांचे यामागचे प्रयत्न लपून राहत नाहीत. परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नियोजित अमेरिका दौर्‍यावरूनही इम्रान यांची आदळआपट सुरू आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकेन आणि बिलावल यांचे वडील आसिफ अली झरदारी यांची भागीदारी असून त्यांनी कोट्यवधी रुपये जगभरात कुठे कुठे दडवून ठेवले असल्याचा आरोप करतानाच, बिलावल हे ब्लिंकेन यांच्याकडे पैशाची भीक मागतील, आपल्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील, असा आरोप त्यांनी केला आहे. एकूणच सत्ता गमावल्याबरोबर इम्रान खान यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. हा मनुष्य एका देशाचा पंतप्रधान होता, यावरही विश्वास बसणार नाही, असे त्यांचे वर्तन आहे. त्यामुळेच पाकिस्तानची जनता त्यांना भीक घालण्याच्या मन:स्थितीत नाही. निरर्थक बडबडीऐवजी ज्या जनतेने डोक्यावर घेतले आणि सत्ता हाती दिली त्याच जनतेने पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच सत्तेवरून का हाकलले, या प्रश्नाचे उत्तर इम्रान यांनी आधी शोधलेले आणि त्या प्रश्नांसाठी लढलेले बरे!

हेही वाचलतं का?

Back to top button