
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध संघटनांतर्फे स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 20 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता रॅलीची सुरुवात नागाळा पार्क येथील इंदिरा निवास येथून दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या उपस्थितीत होईल.
रॅलीत 3 ते 16 वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग असणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली सकाळी साडेदहा वाजता, भाऊसिंगजी रोडवरील 'पुढारी भवन' येथे येणार आहे. 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादनाने रॅलीची सांगता होईल. जिल्हा स्केटिंग असोसिएशन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण वर्ग आणि पंचगंगा विहार व नारायणी स्केटिंग वर्ग बोंद्रेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्मृतिज्योत स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, विक्रमवीर स्केटिंगपटू अॅड. धनश्री कदम, प्रेरणा भोसले, ऐश्वर्या बिरंजे आदींनी केले आहे.