Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

एका हाताने १,५०० रुपये, दुसऱ्या हाताने महागाईचा फटका; पारध बुद्रुकमधील महिलांचा संतप्त सवाल
Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Published on
Updated on

सागर देशमुख

पारध : घरगुती स्वयंपाकघरात दररोज आवश्यक असलेल्या किराणा वस्तूंच्या दरात गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर, तूर डाळ, हरभरा डाळ, खाद्यतेल, खोबरे, शेंगदाणे, चहा पावडर तसेच कपडे धुण्याच्या पावडरीच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींना महिन्याचा घरखर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

‘एका हाताने महिलांना लाडकी बहीण योजनेचे १,५०० रुपये द्यायचे आणि दुसऱ्या हाताने स्वयंपाकघरातील किराणा महाग करून तेच पैसे काढून घ्यायचे का?’ असा संतप्त सवाल पारध बुद्रुक येथील महिलांनी उपस्थित केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही महिलांनी केली.

Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Grocery Price Hike |किराणा मालाला महागाईची फोडणी!; जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

साखरेच्या दरवाढीने गृहिणी हैराण

गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे महिलांनी सांगितले. मे महिन्यात सुमारे ४१ रुपये किलो असलेली साखर ५ जून रोजी ४४-४५ रुपये, १ जुलै रोजी ४६-४८ रुपये, १ ऑगस्ट रोजी ५१ रुपये, १४ ऑगस्ट रोजी ५२-५५ रुपये, १८ ऑगस्ट रोजी ५८ रुपये आणि १९ ऑगस्ट रोजी ६२ रुपये किलोपर्यंत पोहोचली. २१ ऑगस्ट रोजी साखरेचा दर ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. दररोजच्या चहा आणि स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ झाल्याने घरखर्चावर त्याचा थेट परिणाम होत असल्याची भावना गृहिणींनी व्यक्त केली.

डाळींच्या दरातही मोठी वाढ

तूर डाळ आणि हरभरा डाळीच्या दरातही गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. तूर डाळ ९० रुपयांवरून १३० रुपये किलो, तर हरभरा डाळ ५५ रुपयांवरून ८५ रुपये किलो झाली आहे. डाळी हा रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा वापर कमी करणे शक्य नसल्याने वाढत्या दराचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे.

Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Grocery Price Hike: घर चालवणे झाले आणखी महाग! किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

रुचिता तबडे, गृहिणी :
“तूर डाळ आणि हरभरा डाळ या आपल्या रोजच्या जेवणातील अत्यावश्यक वस्तू आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांत दोन्ही डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरखर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. तूर डाळ ९० रुपयांवरून १३० रुपये किलो, तर हरभरा डाळ ५५ रुपयांवरून ८५ रुपये किलोपर्यंत गेली आहे. रोजच्या जेवणात डाळीशिवाय पर्याय नसल्याने कितीही काटकसर केली तरी खर्च कमी होत नाही. सरकारने डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण आणून सर्वसामान्य गृहिणींना खरा दिलासा द्यावा.”

तेल, खोबरे, शेंगदाणेही महाग

स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे महिलांनी सांगितले. एप्रिलमध्ये सुमारे ११५ रुपये किलो असलेले तेल ऑगस्टमध्ये १६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. तसेच जूनमध्ये सुमारे २२५ रुपये किलो असलेले खोबरे ३५० रुपये किलोपर्यंत, तर शेंगदाणे ९० रुपयांवरून १४० रुपये किलोपर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले.

Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Grocery Price Hike | महागाईचा थेट फटका; कडधान्य, खाद्यतेल आणि शेंगदाण्यांच्या दरात मोठी उसळी

साक्षी देशमुख, गृहिणी :
“स्वयंपाकघरात तेलाशिवाय एकही दिवस चालत नाही. मात्र गेल्या काही महिन्यांत तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. एप्रिलमध्ये सुमारे ११५ रुपये किलो असलेले तेल आता ऑगस्टमध्ये १६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. दररोजच्या स्वयंपाकासाठी तेल आवश्यक असल्याने त्याचा वापर कमी करणेही शक्य होत नाही. किराणा मालाच्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढत असताना घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा द्यावा.”

चहा पावडर, निरमा पावडरीच्या दरातही वाढ

किराणा बाजारातील इतर वस्तूही महागल्या आहेत. निरमा पावडरीचा दर जूनमध्ये सुमारे ५० रुपयांवरून ऑगस्टमध्ये ८० रुपयांपर्यंत, तर चहा पावडरीचा दर ४०० रुपयांवरून ५०० रुपये झाल्याचे महिलांनी सांगितले.

‘लाडकी बहीण’चा लाभ महागाईतच संपतो

घरातील अन्नधान्य, भाजीपाला, दूध, गॅस, मुलांचे शिक्षण आणि इतर खर्च सांभाळताना किराणा वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींची मोठी कसरत होत आहे. पूर्वी ठरावीक रकमेत महिन्याचा किराणा भागत होता; मात्र आता त्याच वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने घरखर्चाचा ताळमेळ बिघडला आहे.

Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Pune Grocery Market Prices: श्रावणपूर्वी किराणा बाजारात साखरेला गोडी; भावात पुन्हा वाढ, शेंगदाणे मात्र स्वस्त

रेखा लोखंडे, गृहिणी :
“साखरेचे दर गेल्या काही महिन्यांत एवढ्या झपाट्याने वाढले आहेत की, आता रोजच्या चहासाठीही घरखर्चाचा विचार करावा लागतो. मे महिन्यात सुमारे ४१ रुपये किलो असलेली साखर आज ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. एवढी मोठी दरवाढ सर्वसामान्य कुटुंबांनी कशी सहन करायची? महिलांना १,५०० रुपये मिळत असले तरी साखर, तेल, डाळी आणि इतर किराणा वस्तू महागल्याने ही रक्कम घरखर्चातच संपून जाते. सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणावे.”

महागाईवर नियंत्रणाची मागणी

महिलांना आर्थिक मदत देण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे पारध बुद्रुक येथील गृहिणींनी सांगितले. किराणा वस्तूंच्या दरवाढीची प्रशासनाने दखल घेऊन बाजारातील दरांची तपासणी करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. महिलांचा सवाल एकच — ‘लाडकी बहीण’ म्हणून १,५०० रुपये देताना स्वयंपाकघरातील वाढत्या महागाईवरही सरकारने लक्ष द्यावे; अन्यथा मिळणारी मदत महागाईतच संपून जाते!

Grocery price hike : महागाईचा भडका; किराणा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले
Sugar price hike Maharashtra: श्रावण-सणासुदीआधी साखर महागली; गोडीवर पडले महागाईचे सावट

मंजुषा आंबेकर, किराणा विक्रेता :
“गेल्या काही महिन्यांत किराणा मालाच्या घाऊक दरात सातत्याने चढ-उतार आणि वाढ होत असल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही होत आहे. विशेषतः साखर, तूर डाळ, हरभरा डाळ, खाद्यतेल, खोबरे आणि शेंगदाणे यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या खरेदी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आम्ही विक्रेतेही वाढलेल्या दराने माल खरेदी करत असल्याने इच्छा असूनही कमी दरात विक्री करणे शक्य होत नाही. ग्राहक आणि किरकोळ विक्रेते दोघांनाही या वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. शासनाने पुरवठा आणि बाजारभावावर लक्ष ठेवून दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news