Grocery Price Hike: घर चालवणे झाले आणखी महाग! किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, मालवाहतुकीचा खर्चही वाढला
Grocery
GroceryPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातील वाढ, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील मागणी यामुळे गेल्या सहा महिन्यांत किराणा वस्तूंच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

त्यातच डाळी, धान्ये, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक किराणा खर्च हजारो रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून गेले आहे. त्यामुळे जगणे नकोसे झाले आहे.

Grocery
Barvi Dam Water Level: धरण क्षेत्रात दमदार पाऊस; ठाण्याचे बारवी ६८ टक्के भरले

बाजारातील घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूगडाळ, हरभरा, चवळी, मटकी आणि वाटाणा यांच्या दरात ५ ते ३० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे, गहू, तांदूळ आणि बाजरीच्या दरातही वाढ झाल्याने दैनंदिन आहार महागला आहे.

साखरेच्या किमतीत आठ रुपयांची वाढ झाल्याने चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या खर्चातही वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या बाजारातही तेजी कायम असून, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकाचा खर्च आणखी वाढला आहे.

नारळाच्या किमतीतही १० ते २५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव आणि दैनंदिन वापरासाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Grocery
Traffic Jam: कल्याण-शीळ मार्गावर भीषण वाहतूककोंडी; तब्बल दोन तास वाहनचालक अडकले

त्याशिवाय काही भागांत झालेला कमी पाऊस, उत्पादनातील घट, साठेबाजीची शक्यता आणि वाढती मागणी यामुळे अनेक वस्तूंचे दर तेजीत आहेत. घाऊक बाजारातील वाढलेले दर थेट किरकोळ बाजारात पोहोचल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. महागाईमुळे गृहिणींना घरखर्चाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईविरोधात जनसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

स्वस्त पर्यायांचा शोध जारी; महागाईचा दर आणखी वाढण्याची शक्यता

पूर्वी महिनाभरासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करणारी अनेक कुटुंबे आता आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करत आहेत. काहींनी महाग झालेल्या डाळी आणि खाद्यपदार्थांचा वापर कमी करण्यास सुरुवात केली असून, स्वस्त पर्यायांचा शोध घेतला जात आहे.

आगामी काही आठवड्यांत उत्पादन आणि पुरवठा सुरळीत राहिला तर काही वस्तूंच्या किमती स्थिर राहू शकतात. मात्र इंधन दरात पुन्हा वाढ झाली किंवा पावसाचा परिणाम शेतीवर झाला, तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news