Grocery Price Hike |किराणा मालाला महागाईची फोडणी!; जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Grocery Price Hike | जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले
Pulses
PulsesPudhari
Published on
Updated on

देवळा : पुढारी वृत्तसेवा

दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या किराणा मालाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल, चहा, मसाले, गहू पीठ, तांदूळ तसेच साबण, डिटर्जंट आणि टूथपेस्टसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे घरगुती खर्चात मोठी वाढ झाली असून, अनेक कुटुंबांना इतर गरजांच्या खर्चात कपात करण्याची वेळ आली आहे.

Pulses
Mumbai - Nashik Highway | मुंबई नाशिक महामार्ग गेला खड्यात : रस्त्याची झाली चाळण, तरी टोल वसुली जोरात!

गेल्या काही आठवड्यांपासून घाऊक बाजारात विविध वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम आता किरकोळ बाजारातही स्पष्टपणे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते उत्पादन खर्चात झालेली वाढ, इंधनाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च तसेच काही वस्तूंचा मर्यादित पुरवठा यामुळे किराणा मालाचे दर वाढले आहेत.

काही नामांकित कंपन्यांनी पॅकबंद वस्तूंच्या किमती वाढविल्या असून, काही उत्पादनांमध्ये वजन कमी करून त्याच किमतीत विक्री केली जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. निश्चित उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरभाडे, वीजबिल, शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक खर्च भागविताना मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे. गृहिणींनाही घरखर्चाचे नियोजन करताना अनेक वस्तूंच्या खरेदीत कपात करून आवश्यक आणि अनावश्यक खर्चामध्ये तडजोड करावी लागत असल्याचे चित्र आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काही वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शासनाने बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवून आवश्यक उपाययोजना केल्यास दर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

Pulses
Mumbai - Nashik Highway | मुंबई नाशिक महामार्ग गेला खड्यात : रस्त्याची झाली चाळण, तरी टोल वसुली जोरात!

वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत असून, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, साठेबाजीवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"दर महिन्याला घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण होत चालले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर सतत वाढत असल्याने पूर्वी महिनाभर पुरणारा किराणा आता कमी पडतो. मुलांचे शिक्षण, वीजबिल, इतर खर्च भागवताना अनेक वस्तूंमध्ये कपात करावी लागते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, साठेबाजीवर कारवाई करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा."

- रत्ना ठाकरे, गृहिण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news