छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : किमान बारावी उत्तीर्ण, अशी पात्रता असलेल्या पोलिस शिपायाच्या भरतीसाठी वकील, अभियंत्यांसह हजारो उच्चशिक्षित बेरोजगारांचा लोंढा १९ जून रोजी मैदानावर उलटला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या १२६ आणि चालक शिपाई पदाच्या २१, अशा १४७ पदांसाठी आलेल्या ७ हजार १९० अर्जदारांमध्ये सुमारे ४ हजार १०८ उच्चशिक्षित उमेदवार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली. यावरून बेरोजगारांची दयनीय स्थिती उघड झाली.
इच्छित नोकरीच्या शोधात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मिळेल त्या नोकरीसाठी प्रयत्न करावे म्हणून बीई, बी.टेक., एमबीए, वकील यासह एम.कॉम. बी. फार्म. शिकलेले अनेक जण या भरतीत सहभागी झाले आहेत. यामध्ये तब्बल ९६ अभियंते व पाच वकील आहेत. व्यावसायिक पदवी घेऊन आपल्या स्वतंत्र क्षेत्रात शासकीय नोकरी करावी किंवा स्वतंत्र व्यवसाय करावा, अशी सुप्त इच्छा प्रत्येक उच्चशिक्षत तरुणांमध्ये असते. मात्र ज्या अभ्यासक्रमातून पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, त्या क्षेत्रात शासकीय नोकरी मिळत नाही. त्यामुळे नाइलाजाने रिक्त पदासाठी निघालेल्या कोणत्याही जागांवर अर्ज करण्याची ओढ बेरोजगार तरुण तरुणींमध्ये दिसत आहे. पदवी आणि प्रतिष्ठा बाजूला सारून पोटाची खळगी भरण्यासाठी पोलिस विभागात शिपाई म्हणून काम करण्याची तयारी या तरुणांनी केली आहे. उच्चशिक्षितांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने जे उमेदवार केवळ बारावी शिकलेले आहेत तेसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, ग्रामीण पोलिस भरतीत पहिल्या दिवशी बोलावलेल्या एकूण उमेदवारांपैकी ६३८ उमेदवार हजर राहिले. त्यापैकी ५३२ उमेदवार पात्र ठरले तर १९६ उमेदवार अपात्र ठरले आहेत, अशी माहिती अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. पोलिस भरतीसाठी जवळपास ४ हजारांहून अधिक उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी अर्ज केले आहेत. त्यांच्या शिक्षण आणि गुणवत्तेचा पोलिस विभागाला नक्कीच फायदा होईल. वाढती सायबर गुन्हेगारी आणि तंत्रज्ञानाचे युग पाहता अशा उच्चशिक्षितांची पोलिस खात्याला मदतच होईल. मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
हेही वाचा