Nashik News | शहर पोलिस दल होतेय “फिट”

Nashik News | शहर पोलिस दल होतेय “फिट”
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांनी स्वत:च्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. काही वर्षांपासून पोलिसांचा पिळदार शरीरयष्टी बनवण्यासोबतच सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्य ठेवण्याचा कल वाढला आहे. शहरातील एक हजार २५३ अंमलदारांची बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) चाचणी केल्यानंतर त्यातील ९०९ पोलिस फिट ठरले, तर उर्वरित 'वजनदार' आहेत. दरवर्षी फिट पोलिसांची संख्या वाढत असल्याचे सकारात्मक चित्रही चाचणीत आढळून आले आहे.

दरवर्षी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची बीएमआय (Body Mass Index) चाचणी केली जाते. चाचणीत जे पोलिस उत्तीर्ण होतात त्यांना दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात तंदुरुस्त प्रोत्साहन भत्ता लागू झालेल्या अंमलदारांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये ९०९ अंमलदार वैद्यकीय चाचणीत फिट ठरले आहेत. त्यात सर्वाधिक पोलिस मुख्यालयातील १११, मोटार परिवहन विभागातील ८५, वाहतूकचे ७४, पंचवटीतील ४८, नाशिक रोड, भद्रकाली व गुन्हे शाखेतील प्रत्येकी ४७ अंमलदार तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. अंबडमधील ४३, मुंबई नाक्याचे ३८, सरकारवाडा ३७, इंदिरानगर ३४, उपनगर ३३, गंगापूर ३०, सातपूर २९, म्हसरूळ २७, विशेष शाखेतील २२, आडगाव २१, देवळाली कॅम्प १४, सायबरचे १२, आर्थिक गुन्हे शाखेतील ८, एमआयडीसी पोलिस चौकीतील ५ अंमलदार तंदुरुस्त ठरले आहेत. पोलिस ठाणे वगळता दंगल नियंत्रण पथकातील २४, नियंत्रण कक्षातील १७, बिनतारी आणि बॉम्बशोधक व नाशक पथकातील प्रत्येकी ११, जलद प्रतिसाद पथकातील ८, दामिनी पथकातील ७, महिला सुरक्षेचे ६, अभियोग कक्षाचे ५, तांत्रिक विश्लेषणचे ४, तक्रार निवारणचे दोन आणि वाचक व अतिक्रमण शाखेतील प्रत्येकी एक अंमलदार तंदुरुस्त ठरले आहेत.

यांची होते चाचणी

पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे यासाठी ३० वर्षांपुढील पोलिसांची बीएमआय चाचणी होते. तंदुरुस्त असणाऱ्या पोलिसांना दरमहा २५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) हे वयानुसार शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. वजनाला उंचीच्या वर्गाने भागले असता निर्देशांक कळतो. १८ ते २५ हा सामान्य निर्देशांक आहेत. २५ ते ३० निर्देशांक हा वाढलेल्या वजनात मोडतो, तर ३० च्या पुढील निर्देशांक असणाऱ्यांना लठ्ठपणा आहे, असे म्हटले जाते. त्यानुसार पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या पोलिसांचे शरीर वस्तुमान निर्देशांक करण्यात येते.

प्रोत्साहन भत्ता वाढवण्याची मागणी

शहर पाेलिस दलातील फिट पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, तदुंरुस्त पाेलिसांना दरमहा फक्त अडीचशे रुपये प्रोत्साहन भत्ता असल्याने काही पोलिस वैद्यकीय चाचणीकडे दुर्लक्ष करतात. सकस आहार, जीम, व्यायाम खर्च व प्रोटिन्सचा खर्च विचारात घेतला तर अडीचशे रुपयांत ते शक्य होत नाही. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी 'फिट' असूनही अनेक अंमलदार अर्ज करीत नसल्याचे बोलले जाते. तसेच प्रोत्साहन भत्ता वाढवण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news