औरंगाबाद ‘ऑनर’ किलिंग प्रकरण : थंड डोक्याने आईनेच संपविले…; किर्ती थोरे हत्येवेळी नेमकं काय घडलं… | पुढारी

औरंगाबाद 'ऑनर' किलिंग प्रकरण : थंड डोक्याने आईनेच संपविले...; किर्ती थोरे हत्येवेळी नेमकं काय घडलं...

औरंगाबाद, पुढारी ऑनलाईन : किर्ती थोरे…सहा महिन्यांपूर्वी अविनाशशी लग्न करून घरात आली आणि घर बोलू लागलं. गावात तिचं माहेर. अविनाशबरोबर कॉलेजला जाता जाता त्यांची मनं जुळली आणि विरोध झुगारून त्यांनी लग्न केलं. ‘पोरगी गेली तवाच मेली’ असं माहेरच्यांनी जाहीर केलं; पण तिनं सासरच्यांना जीव लावला.अखेर मुलीला आवडणाऱ्या तुपाचा डबा घेऊन आलेल्या आईनं तिचे पाय धरले आणि आपल्या अल्पवयीन मुलाला कोयत्याने वार करायला लावले.

जन्मदात्या आईचा हा निर्दयीपणा आता सगळ्यांच्या जिव्हारी लागत आहे. किर्तीचा पती अविनाश आता तिच्या आठवणीने व्याकूळ होत आहे. वैजापूर येथील ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना सर्वांना सुन्न करत आहे.

अविनाश आणि किर्ती थोरे हे दोघे एकाच गावातील आणि एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही एकाच समाजातील. कॉलेजला जाता जाता दोघांची मने जुळली. प्रेम प्रकरण घरी समजल्यानंतर तिचे कॉलेज बंद केले. अखेर दोघांनी पळून जाऊन आळंदीत लग्न केले.

किर्तीने पळून जाऊन लाग्न केल्यानंतर तिचे वडील सैरभैर झाले. असे म्हणतात की, ते रोज घरात दंगा घालत होते. मुलगा आणि आईला मारहाण करत आणि तिचे काहीतरी करा नाहीतर मी जिवाचे बरेवाईट करून घेतो. किर्ती आणि अविनाश लग्नानंतर महिनाभर गावाबाहेर होते. महिन्याने ते गावी आले. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांचा संसार सुरू झाला. दोघेही आनंदात होते; पण अखेर या आनंदाला गालबोट लागले ते आईचे.

सहा महिने कुठलाही संबध नसलेले माहेरचे लोक किर्तीच्या घरी अचानक आले. आठ दिवसांपूर्वी तिची आई घरी आली. त्यावेळी किर्तीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. झाले गेले विसरून गेले म्हणून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई घरी आल्याने तिला काय करू आणि काय नको असे झाले. पण त्याचवेळी आईच्या मनात वेगळाच कट शिजत होता. तिच्या ओठांवर हसू, डोळ्यात प्रेम दिसत असले तरी तिच्या डोक्यात मात्र क्रूर कट शिजत होता. लेकीशी गोडीगुलाबीने बोलून पुन्हा येण्याचे वचन देत ती निघून गेली. जाताना तिने सगळा परिसर न्याहाळला.

आई येऊन गेल्याने किर्ती खूश होती. आपल्या दोघांचे नाते स्वीकारले असे तिला वाटले. सगळे सुरळीत होत असताना आणखी एक आनंदाची बातमी आली की, तिला दिवस गेले होते. तीन दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्याने सासरचेही आनंदात होते. अखेर तो काळ घेऊन आलेला दिवस उगवला.

अखेर डाव साधला

अविनाशच्या घरातील सर्वजण घरापासून लांब असलेल्या शेतात कामासाठी गेल्याची माहिती घेऊन किर्तीची आई आणि भाऊ घरी आले. त्यावेळी किर्ती शेतात काम करत होती. तर अविनाश तब्येत बरी नसल्याने घरी येऊन झोपला होता. किर्तीला शेतातून बोलावून घरी आणले. भाऊ, आई घरी आले म्हणून किर्ती चहा, नाष्टा करू लागली. मात्र, इकडे सगळा प्लॅन मनाप्रमाणे जुळून आला होता. अविनाश झोपला होता आणि तिकडे किचनमध्ये किर्तीला खाली पाडून तिच्या आईने पाय धरले. किर्तीच्या भावाने येताना सोबत कोयता आणला होता. धडपडीत किचनमधील डबे पडले. त्यामुळे अविनाशला जाग आली. तो जाऊन पाहतो तर किर्तीच्या आईने तिचे पाय धरले होते तर तिचा भाऊ तिच्यावर सपासप वार करत होता. तो अडवायला गेला तर तिचा भाऊ कोयता घेऊन त्याच्यावर धावला. त्यामुळे अविनाश बाहेर गेला. त्याने घाबरून चुलतीला हाक मारली. तोपर्यंत तिच्या भावाने तिचे शिर धडावेगळे केले होते. तो शांतपणे तिचे शिर घेऊन बाहेर आला. त्यानंतर त्याने एक सेल्फी काढला. आईही बाहेर आली. तिने शांतपणे आपल्या मुलग्याला आत जाऊन कोयता आणण्यास सांगितले. त्यानंतर दोघे शांतपणे घरी गेले. किर्तीच्या हत्येचा इतका धक्का बसला की, काही काळ कुणालाच कळले नाही. अविनाश तर स्तब्ध झाला.

अंघोळ करून, कपडे धुवून पोलिस स्टेशनला हजर

किर्ती थोरे हिचा  भाऊ आणि आई यांनी हत्या केल्यानंतर दोघेही घरी गेले. त्यांनी अंघोळ केली. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे टाकून देत दुसरे कपडे घातले आणि पोलिस स्टेशनला हजर झाले. या दोघांनीही शांत डोक्याने हा खून केला. दिवाळीनंतर घरी आलेल्या किर्तीच्या आईने तूप घेऊन येण्याचे वचन दिले. मात्र, आईच्या डोक्यात काय शिजतेय याचा अंदाज किर्तीला आलाच नाही. तिच्या आईने आधी रेकी करून नंतर थंड डोक्याने किर्तीला संपवले.

हेही वाचलं का? 

Back to top button