नताशा जितेंद्र आव्हाड यांची अशीही प्रेम कहाणी, शाळकरी सवंगड्यासोबत बांधली जन्मगाठ!  | पुढारी

नताशा जितेंद्र आव्हाड यांची अशीही प्रेम कहाणी, शाळकरी सवंगड्यासोबत बांधली जन्मगाठ! 

ठाणे : दिलीप शिंदे

नेता केवळ नेतृत्व करत नाही तर समाजोपयोगी संदेश ही आपल्या कृतीतून दाखवून देत असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घडवून आणलेला आपल्या एकुलत्या एका मुलीचा विवाह सोहळा. अत्यंत साधेपणा, कोणताही बडेजाव नाही. कसलाही चंगळवाद नाही. या प्रेम विवाहाची जोरदार चर्चा समाज माध्यमांसह राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचवेळी आपल्या शाळकरी सवंगड्यासोबत आयुष्यभराची जन्मगाठ बांधणारी नताशा जितेंद्र आव्हाड काल नताशा अॅलन पटेल बनली आणि वडिलांप्रमाणे पुरोगामी विचाराने भरवलेल्या लेकीने एक आदर्श घालून दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असून ते नेहमीच चर्चेत असतात. ठाण्यातून राजकीय जीवन सुरु करणाऱ्या आव्हाड यांनी शिक्षण ठाण्यात घेतले आणि आपल्या एकुलत्या एका मुलीला देखील ठाण्यातील शाळेत शिकविले. सिंघानिया शाळेत शिकत असताना नताशा हिच्या अनेक मित्र मैत्रिणी होत्या. त्यापैकी ठाण्यातील कॅस्टेल मिल येथे राहणाऱ्या अॅलन पटेल याच्याशी तिची चांगलीच गठ्ठी जमली.

हळूहळू त्यांच्यातील मैत्री फुलत गेली. दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर नताशा मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये गेली. त्यानंतर दोघांनी पुढील शिक्षणासाठी स्पेन गाठले. नताशा आणि अॅलन स्पेनमध्ये शिक्षण घेत होते आणि प्रेमाच्या गाठी अधिक दृढ होत होत्या. नताशा ही एम टेक झाली. अॅलन हा एम. एस. इन फायनान्स मॅनेजमेंट पूर्ण केले. शिक्षणात प्रेमाचा कधीच अडथळा आला नाही आणि शिक्षण पूर्ण होताच आयुष्यभराचे जोडीदार बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या प्रेमाला दोन्ही कुटुंबियांनी होकार दिला आणि साखरपुडा होऊन शिकामोर्तब झाले.

येऊर येथे 9 जानेवारीला झालेल्या या साखरपुड्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांची हजेरी लागली होती. त्यामुळे लग्नाच्या पत्रिकांची सगळ्यांना प्रतीक्षा होती. अनेक नेत्यांच्या मुला मुलींची धूमधडाक्यात लग्न होत असताना अचानक तीन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून सगळ्यांना सुखद धक्का दिला. त्या व्हिडिओत आपल्या गावाच्या पद्धतीप्रमाणे देवदैवतांना आवाहन करणारे गोंधळ घालण्याचा, नृत्य करण्याचा आणि लग्नात कोणतेही विघ्न येऊ नये, असे साकडे घालण्याचे दृश्य होते.

अशापद्धतीने लग्नाची धामधूम सुरू असताना लग्न हे अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा नताशाचा आग्रह पाहून जितेंद्र आव्हाड यांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अगदी निवडक नातेवाईकांच्या साक्षीने घरातच रजिस्टर लग्न करून एक आदर्श घालून दिला. नताशा जितेंद्र आव्हाड हिने अंगावर फारसे दागिने देखील घातले नव्हते. गमंत म्हणजे लग्नाच्या काही तासानंतर आव्हाड यांनी पोलिसांच्या एका कार्यक्रामाला हजेरी लावली होती. स्वतःचा व्यवसाय सुरु केलेल्या नताशाने युके मधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या आपल्या बालपणाच्या सवंगड्यासोबत आयुष्यभराची जन्मगाठ बांधली आणि जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा .. बाबूल की दुआये लेती जा. जा तुझको सुखी संसार मिले.. अशा भावना व्यक्त करीत आव्हाड यांनी आपल्या मुलींची आनंदाश्रूने पाठवणी केली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

Back to top button