

देगलूर,पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील कावळगड्डा येथील शेताजवळील बंधाऱ्यानजीकच्या खड्ड्यातील पाण्यात पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयदावक घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली.
या घटनेची माहिती त्याच्या सोबतच गेलेल्या एका मुलाने गावात धावत येऊन दिली, मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता. अक्षय रोहीदास राजूरे (वय १०) , प्रमोद हणमंत राजूरे (वय ११, रा. कावळगड्डा) असे मृताचे नाव आहे.
देगलूर तालुक्यातील कावळगड्डा येथील ही दोन्ही मुले शाळेत शिकतात. शाळेस सुट्या असल्याने नागनाथ गणेश पुडे (वय ११ ) शुक्रवारी, सकाळी घरातून शेताकडे गेली होती.
नागनाथ पुडे हा पुढे गेला असता दिलीप पाटील यांच्या शेताजवळील बंधाऱ्याच्या खालच्या बाजूच्या खड्ड्यातील पाण्यात अक्षय आणि प्रमोद ही दोन्ही मुले पोहण्यासाठी गेली. पाण्यात उड्या घेतल्यानंतर पाण्यातील डोहामध्ये असलेल्या गर्तेत अडकून ती बुडायला लागली. यावेळी नागनाथ पुडे परत आला असता दोघे बुडाल्याचे पाहून गावाकडे धाव घेतली. अक्षयच्या वडिलांना घटनेची माहिती दिली, मात्र ते पोहचे पर्यंत दोघेही बुडाले होते.
त्यांना बाहेर काढताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांचे शवविच्छेदन करून कावळगड्डा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती रोहिदास भुजंगराव राजुरे (वय ३६, रा कावळगड्डा) यानी देगलूर पोलिस ठाण्यात दिली.
हेही वाचा :