परमबीर सिंग : देशाचे गुन्हेगार ! | पुढारी

परमबीर सिंग : देशाचे गुन्हेगार !

सार्‍या गृह विभागाची आणि विशेषत: पोलिस खात्याची केवळ ‘छी-थू’च नव्हे, तर पुरती बेअब्रू झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग 232 दिवसांनी एकदाचे त्यांच्या ‘कर्मभूमी’त परतले! इतक्या उच्च पदावर नियुक्तीस असलेल्या आणि थेट गृहमंत्र्यांवर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करणारे परमबीर इतके दिवस पोलिसांना आणि न्यायालयाला चुकवत-चकवत भारतातच लपून बसले होते. ते विदेशात लपल्याची अफवा पसरवण्यात आली; पण त्याने तपास यंत्रणांची दिशाभूल झाली असावी, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. ते बेपत्ता होते. ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर त्यांना कोर्टाने फरार घोषित केले. न्यायालयाने अखेरची संधी देऊनही ते आले नसते, तर त्यांना बेड्या पडल्या असत्या. आता आपण केलेल्या आरोपांबाबत कोणतेच पुरावे आपणाकडे नाहीत आणि आपण कोणालाही वसुलीचे टार्गेट दिले नव्हते, असे घूमजाव त्यांनी तपासात केले आहे, हे विशेष! त्यांच्यावर राज्य सरकारला फितूर झाल्याचा आरोप होत आहे. आधी त्यांना हेच सरकार फरार घोषित करते आणि आता फितुरीचा आरोप होत आहे. त्यांच्या भोवती फिरणारे सारेच प्रकरण चक्रावून टाकणारे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानासमोर उभ्या केल्या गेलेल्या वाहनावरून सुरू झालेले हे प्रकरण आता राज्याचा गृहमंत्री, होमगार्ड विभागाचा महासंचालक, एक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या गजाआड जाण्यापर्यंत पोहोचले. ‘त्या’ वाहनाचा मालक मनसूख हिरेन याची हत्या झाली. अर्थात, ही आरोप-प्रत्यारोपातून आणि तपासातून पुढे आलेली प्रकरणे! अजूनही अंधारात असलेल्या घटना-घडामोडींवर भाष्य न केलेलेच बरे! यातून केंद्र आणि राज्याच्या राजकारणाच्या कात्रीत पोलिस खाते, सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांचे हसेच झाले. पोलिस यंत्रणेवरील जनतेच्या विश्वासाला मोठा तडा गेला. आजवर सांगोवांगी आणि नुसत्या पोकळ चर्चेत राहणार्‍या लाच आणि खंडणी प्रकरणांचा ‘पसारा’ किती मोठा आहे आणि त्यांनी सारी प्रशासन व्यवस्थाच कशी पोखरून टाकली आहे, याचेच हे ढळढळीत उदाहरण. सचिन वाझेच्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणात परमबीर सिंग हेच मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आलेे. त्यांच्यावर मुख्य आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी खंडणी वसूल केल्याचा आहे. खुद्द परमबीर यांनीच हा गौप्यस्फोट केला आणि आपल्याच गुंत्यात ते अडकत गेले. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी देशमुख यांना कोठडीत टाकले असताना त्याच प्रकरणात राज्य सरकारने परमबीर यांच्या मुसक्या आवळल्या. धमकावणे, खंडणीचे दुसरे गुन्हेही दाखल आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगासमोरही परमबीर सातत्याने गैरहजर आहेत. चौकशीला स्वत: हजर राहा अन्यथा वॉरंटला सामोरे जा, अशी तंबीच आयोगाने दिल्याने आता ही चौकशीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. आयोगासमोर ते हजर राहत नसल्याने त्यांना अजामीनपात्र वॉरंट लागू केले गेले. आता ते मुंबईत प्रकटल्याने आयोगाच्या चौकशीसही सामोरे जातील, असे दिसते. त्यांच्यावर गंभीर आरोप आहे तो 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेल्या अजमल कसाब याचा मोबाईल लपवल्याचा. मुंबई पोलिस दलातील निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शमशेर पठाण यांनी केलेल्या या आरोपानेही पोलिस खात्यातील काही सडक्या वृत्तीच्या बेजबाबदार लोकांनी सुरू केलेली गुन्हेगारी किती टोकाला पोहोचली होती, हे स्पष्ट होते. हा आरोप गंभीर आहेच आणि त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. हा खरे तर राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कामाचा विषय आहे. आरोपाचा रोख परमबीर यांचे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन असण्याकडे आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यावेळी सापडलेला मोबाईल फोन परमबीर सिंग यांनी चौकशीसाठी घेतला होता. त्यावेळी ते राज्य दहशतवादविरोधी पथकात कार्यरत होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आली होती. परमबीर यांनी हा मोबाईल गुन्हे शाखेकडे दिला असता, तर पाकिस्तानी हँडलर आणि इतर कुणी या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते का, हे कळू शकले असते; मात्र त्यांनी तो गुन्हे शाखेकडे दिला नव्हता, असा आरोप आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी ज्या-ज्या लोकांशी भारतात संपर्क केला होता, त्या सर्वांना बोलावून परमबीर सिंग यांनी या घटनेत पैसे घेतले असतील, असा आरोपही पठाण यांनी केला आहे. मुंबई हल्ल्याची तेरावी वर्षपूर्ती होत असताना हे प्रकरण नव्याने समोर आणले गेले, हाही योगायोग. परमबीर यांच्यावर लागलेली ही आरोपांची मालिका न थांबणारी आहे. त्यावर चौकशीत त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल; मात्र या सार्‍याच घटनाक्रमातून आणि त्यांच्यावरील आरोपावरून हे लक्षात येते की, जबाबदारीच्या पदावर किती बेजबाबदार, भ्रष्ट आणि देशाशी गद्दारी करणारी माणसे नेमली गेली. अर्थात, त्यामागचे राजकारण्यांचे लागेबांधे आणि या पोलिस वर्दीतील गुन्हेगारांची भलावण करणार्‍या राजकारण्यांचा नकली, भेसूर चेहरा या सार्‍याच गोष्टी सार्‍या समाजाला आणि देशाला चिंतेत टाकणार्‍या आहेत. आपण निवडून दिलेले काही लोकप्रतिनिधी अपवादाने का असेनात; पण कोणत्या लायकीचे आहेत आणि त्यांच्या हाताखालील प्रशासनाचे काही अधिकारी किती हिन वृत्तीचे, बेभान आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, हे लक्षात आल्यावर कोणती व्यवस्था आपण तयार केली आहे आणि ती माणसाला, समाजाला आणि देशाला कोठे घेऊन जात आहे, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. हे कलंकित आणि बेभान झालेले लोक देशाचेच गुन्हेगार आहेत.

Back to top button