चीनमध्ये ‘पेंग’ वादळ, माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचा आरोप | पुढारी

चीनमध्ये ‘पेंग’ वादळ, माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचा आरोप

- प्रसाद प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

चीन मधील लोकप्रिय महिला टेनिसपटू पेंग शुआईने अलीकडेच चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गावली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे जगभरात खळबळ माजली. या आरोपांनंतर ती सध्या गायब आहे. पेंग ही झांग यांची गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखली जात होती.

चीन मध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिसएवढी लोकप्रियता टेनिसला अजून मिळालेली नाही; पण झेंग ली, ली ना आणि पेंग शुआई वगैरे टेनिसपटूंनी चीनमध्ये टेनिसला चांगली गती दिलेली आहे. 35 वर्षीय पेंग शुआई ही चीनमधील एक लोकप्रिय महिला टेनिसपटू आहे आणि तिने अलीकडेच चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गावली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर चीनमध्ये खळबळ माजली. चीनमध्ये ट्विटरला बंदी आहे; पण चीनचे स्वतःचे ट्विटरसारखेच ‘वायबो’ नामक ऑनलाईन व्यासपीठ आहे. झांग गावली यांनी दहा वर्षे आपले अधूनमधून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पेंगने केला. झांग गावली मला घरी बोलवून लैंगिक अत्याचार करीत असत. त्यावेळी त्यांची पत्नी दाराबाहेर पहारा देत असे. त्यांच्या लैंगिक अत्याचारामुळे माझी स्थिती जिवंत प्रेतासारखी झाली होती, असे पेंगने 2 नोव्हेंबर रोजी वायबोवर उघड केले. त्यानंतर चिनी प्रशासनाने वायबोवरील तिचा मजकूर तातडीने काढून टाकला; पण तत्पूर्वीच तिच्या मजकुराचे स्क्रीन शॉट ट्विटरवर गेल्यामुळे सोशल मीडियाद्वारे हे प्रकरण जगभर पोहोचले; पण तेव्हापासून पेंग शुआई गायब आहे.

दबावामुळे चीन सरकारने ‘ग्लोबल टाईम्स’ या मुखपत्राद्वारे पेंग शुआईचे काही फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले. मी आरोप मागे घेत असून, मी सुरक्षित आहे आणि घरामध्ये विश्रांती घेत आहे, असे पेंग शुआई सांगत असलेली पत्रे, ई-मेल, व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख थॉमस बाख यांच्याशी पेंग व्हिडीओ कॉलवर बोलली असल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण एवढे गाजत आहे, कारण माजी उपपंतप्रधानांवरच एवढा गंभीर आरोप झाला आहे. 75 वर्षीय झांग गावली ही साधीसुधी व्यक्ती नाही. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सात सदस्यीय सर्वोच्च पॉलिट ब्युरो स्टँडिंग कमिटीमध्ये झांग गावली सात वर्षे सदस्य होते. एक दशकापूर्वी झांग हे तियानजीन शहर शाखेच्या चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते. त्यावेळी ते या शहराच्या टेनिस क्लबमध्ये नियमितपणे जायचे. तेथे त्यांची स्टार टेनिसपटू पेंग शुआईशी प्रथमच भेट झाली.

आंतरराष्ट्रीय टेनिस जगतात पेंग शुआईचे नाव आहे. तिने 2013 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवले. त्याचप्रमाणे 2014 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेतही तिने दुहेरीचे विजेतेपद मिळवले. एकेरीमध्ये तिने 2014 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पेंग शुआई गायब झाल्यानंतर जागतिक महिला टेनिस संघटनेने चीनमध्ये होणार्‍या आगामी बारा टेनिस स्पर्धा रद्द करण्याची धमकी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या फेब्रुवारीमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचे आव्हान करण्यात येत आहे. जागतिक मानवी हक्क संघटनेनेही पेंग शुआईच्या जीविताविषयी चिंता व्यक्तकेली आहे.

या प्रकरणाला काही राजकीय तज्ज्ञांनी वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचा असा अंदाज आहे की, जिनपिंग हे पेंग शुआईचा उपयोग राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नमवण्यासाठी करत आहेत. पेंग ही झांग यांची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जात होती आणि आता तीन वर्षांनी तिने वायबोसारख्या सरकारी व्यासपीठावर आरोप करण्याचे धाडस करावे, हे आश्चर्य मानले जात आहे. कारण, आरोप केल्यानंतर त्याचे काय गंभीर परिणाम होतील, याची कल्पना पेंग शुआईला नक्कीच असणार; पण तिला संरक्षण देणारा कोणीतरी असावा, असा अंदाज आहे. जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी जियांग झेमीन यांच्या नेतृत्वाखाली शांघाय गँगशी झांग गावली संबंधित आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी जिनपिंग यांनी पेंगच्या ‘मी टू’ चळवळीचा उपयोग केला असावा आणि झांग यांच्यावरील आरोप जगभर पसरावेत, अशी व्यवस्था जिनपिंग यांनीच केली असावी, असाही अंदाज आहे.

सरकारवर टीका केली म्हणून चिनी अब्जाधीश जॅक मा यांना 2020 मध्ये तीन महिने गायब करण्यात आले होते. 2018 मध्ये करचुकवेगिरीच्या घोटाळ्यात सापडलेली चीनची प्रसिद्ध अभिनेत्री फॅन बिंगबिंग हीसुद्धा चार महिने गायब होती. पत्रकार आणि मी टू कार्यकर्ती सोफिया हुआंग सप्टेंबरमध्ये गायब झाली होती. आता वृत्त आहे की, चिनी पोलिसांनी तिला अटक केली. त्यामुळे पेंग शुआईचे आता काय होणार, याविषयी सारे जग चिंतेत आहे.

Back to top button