Anganwadi Worker Movement : चटणी-भाकर खाऊन प्रशासनाचे वेधले लक्ष; अंगणवाडी कर्मचार्‍यांचे अनोखे आंदोलन | पुढारी

Anganwadi Worker Movement : चटणी-भाकर खाऊन प्रशासनाचे वेधले लक्ष; अंगणवाडी कर्मचार्‍यांचे अनोखे आंदोलन

परभणी, पुढारी वृत्तसेवा ः वेतनश्रेणी, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी यासह सेवाविषयक प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबीत असताना राज्य सरकार अंगणवाडी कर्मचार्‍यांना नेहमीप्रमाणे सावत्रप्रमाणी वागणूक देत असून तुटपुंजी मानधन वाढ करून कर्मचार्‍यांच्या भावनांशी खेळले जात असल्याचा आरोप करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी गुरूवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊून आंदोलन केले. अत्यंत संतप्त भावना या कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या. ( Anganwadi Worker Movement )

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मानधन वाढीसह विविध प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी लढा सुरू आहे. महागाई वाढली तरी सरकार मानधन वाढ करीत नाही. सातत्याच्या आंदोलनामुळे या महागाईच्या काळात अंगणवाडी सेविका दहा हजार रूपयांपर्यंत, मिनी अंगणवाडी सेविका 7500 रूपयापर्यंत तर मदतनिस 5500 रूपयांपर्यंत पोचले आहेत. इतर विभागातील कर्मचार्‍यांप्रमाणेच काम करीत असताना इतर विभागातील कर्मचार्‍यांना शासन भरघोस वाढ देते. मात्र अंगणवाडी कर्मचार्‍यांना तुटपूंजी वाढ दिली जात असल्याने महागाईच्या भस्मासुरात हे कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय होरपळून निघत आहे, असे राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाने म्हटले आहे.

त्यामुळे अंगणवाडी कर्मचर्‍यांची पदे ही वैधानिक असल्याने त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असून त्यांना शासकीय कर्मचारी कर्मचारी घोषीत करून सर्व प्रकारचे लाभ देण्यात यावे. सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार रूपये व मदतनिसांना 20हजार रूपये दरमहा मानधन देण्यात यावे. महागाई निर्देशांकानूसार त्यात वाढ करण्यात यावी. मासिक निर्वाह भत्याबाबत निर्णय घेण्यात यावा. व महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यांसाठी 5 हजार ते 8 हजार रूपये भाडे मंजूर करावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेने दिले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, आशा राठोड, छाया सासणीक आदींसह कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

घरूनच आणली चटणी भाकरी 

महागाईच्या काळात अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळणारा मोबदला हा तोकडा असून यातून घरखर्च भागू शकत नाही. त्यामुळे सरकारने सातत्याच्या आंदोलनानंतरही या कर्मचार्‍यांवर चटणी-भाकर खाण्याचीच वेळ आणली आहे. हे दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी घरून चटणी भाकर आणली. ( Anganwadi Worker Movement )

Back to top button