भागीदारी असल्याचे भासवून साडेदहा लाख रुपये लंपास | पुढारी

भागीदारी असल्याचे भासवून साडेदहा लाख रुपये लंपास

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : एलपीजी गॅस पंप चालविणार्‍या महिलेचा भागीदार असल्याचे भासवून चौघांनी पंपावरून १० लाख ५६ हजार २१३ रुपये लंपास केले. हा प्रकार २४ ते २५ नोव्हेंबर २०२२ या काळात घडला. आदित्य कमलकांत पांडे (३९, रा. सिडको एन-३), संतोष मदनराव म्हस्के (३५, रा. नारेगाव) आणि दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली श्रीकांत जाधव (३९, रा. एन-१, सिडको) या फिर्यादी आहेत. त्यांचे पदमपुरा आणि सेव्हनहिल चौकात एलपीजी गॅस पंप आहेत. या दोन पंपांत शीतल पांडे या भागीदार होत्या. तेव्हा त्यांचे पती आदित्य पांडे पंपावर येऊन कामाची व हिशेबाची पाहणी करीत. त्यामुळे तो पंपावरील कामगार, व्यवस्थापक यांच्या परिचित होता. दरम्यान, पांडेची भागीदारी संपली. आता आशा राजन देशमुख या भागीदार आहेत. तरीही, २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पांडे, संतोष म्हस्के व त्यांच्या दोन साथीदारांनी पंपावर जाऊन भागीदार असल्याचे भासवून दोन्ही पंपांवर जमा झालेले १० लाख ५६ हजार २१३ रुपये घेऊन पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर सोनाली जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पांडे व म्हस्के आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button