चाकण : तरुणीचा पाठलाग करून शिवीगाळ, चौघांवर गुन्हा | पुढारी

चाकण : तरुणीचा पाठलाग करून शिवीगाळ, चौघांवर गुन्हा

चाकण/महाळुंगे इंगळे : पुढारी वृत्तसेवा : वीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिच्या घराची कडी वाजवून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांवर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून, फिर्यादी कंपनीतून घरी जात असताना एका काळ्या रंगाच्या मोटारीतून (एमएच 05 एजे 7417) विकास सरवदे (वय 25, रा. चिखली, ता. हवेली) व त्याचे तीन मित्र यांनी पीडितेचा पाठलाग केला. सदर तरुणी घाबरून पळत घरात आली.

त्यानंतर विकास सरवदे याने तरुणीच्या घराचा दरवाजा वाजविला. यावर पीडितेने कोण आहे, असे विचारले असता त्याने विकास सरवदे असे नाव सांगितले. विकासने पीडितेला शिवीगाळ करून बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने प्रसंगावधान राखून महाळुंगे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी लोखंडे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. लोखंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन विकास सरवदे व त्याच्या सोबत असणारे राजेश रामदास पाटोळे (वय 28), ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे (वय 36), आकाश मोकिंद कांबळे (वय 23) यांना ताब्यात घेतले. चारही आरोपींवर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button