खोर : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दाम्पत्य जेरबंद | पुढारी

खोर : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दाम्पत्य जेरबंद

खोर; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या दाम्पत्याला यवत पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. या दाम्पत्यासोबत आणखी काही जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत सुरेश परशुराम दिवेकर (वय 53, रा. सातपुतेमळा, वरवंड, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश शंकर भारती व त्यांची पत्नी (दोघेही रा. सरकारी दवाखान्यामागे, वाघेश्वर इंग्लिश स्कूलजवळ, वाघोली, ता. हवेली) येथील असून, या दाम्पत्याने दि. 30 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी दिवेकर यांना त्यांच्या वरवंड येथील घरी त्यांच्या मुलाकरिता एक मुलगी दाखवली. मात्र, ही मुलगी पसंत नसल्यानंतर त्यांनी दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी दुसरी मुलगी आणि त्यानंतर दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी तिसरी मुलगी दाखवली.

ही मुलगी मुलाला पसंत पडल्याने दिवेकर यांनी दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांना पसंती दर्शविल्यानंतर भारती दाम्पत्याने लग्नाची फी म्हणून अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील सव्वा लाख रुपये तातडीने व उर्वरित रक्कम लग्न झाल्यानंतर भरा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवत दिवेकर यांनी दि. 30 नोव्हेंबर रोजी भारती यांच्या दोन मोबाईलवर 1 लाख रुपये, 50 हजार रुपये पाठविले व दुसऱ्या दिवशी दि. 1 डिसेंबर रोजी पुन्हा 25 हजार रुपये पाठविले.

त्यानंतर लग्नासाठी विचारणा केली असता भारती दाम्पत्याने टाळाटाळ केली आणि आता उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे. दरम्यान, केडगावच्या डुमेवस्ती येथील थोरात यांची अशाच प्रकारे भारती यांनी फसवणूक केल्याची माहिती झाल्याने दिवेकर यांनी नीलेश भारती व त्यांची पत्नी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी यवत पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना अटक केली आहे. दरम्यान, ज्या लोकांना या टोळीने गंडा घालून फसवणूक केली आहे, त्यांनी यवत पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

Back to top button