नगर : शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा | पुढारी

नगर : शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शालेय सहलीच्या निमित्ताने साई दर्शनासाठी आलेल्या 88 विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले असून साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान प्रसार माध्यमातून विषबाधेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मुले, डॉक्टरांशी संवाद साधत रुग्णालय प्रशासनाला काळजी घेण्याचे आदेश दिले.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श शाळेच्या चार शिक्षकांसह 230 विद्यार्थ्यांची सहल नगर जिल्ह्यात पर्यटनासाठी आली होती. शाळा व्यवस्थापनाने सहलीसोबत मुलांच्या जेवणासाठी आचारीही दिला होता. शिर्डीत येण्यापूर्वी सहल श्री क्षेत्र देवगड येथे मुक्कामी होती. तेथे जेवणानंतर सहल शुक्रवारी शिर्डीत साई दर्शनासाठी पोहचली. साई दर्शन घेतल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघणार तोच विद्यार्थ्यांना अचानकपणे जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. साईनाथ रुग्णालय प्रमुख डॉ. प्रीतम वडगावे यांनी तत्काळ उपचार सुरू केले.

त्यामुळे विद्यार्थी बालंबाल बचावले. सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 88 विद्यार्थाना अन्नातून विषबाधा झाली आहे. प्रकृती उत्तम असणार्‍या विद्यार्थ्यांना साईआश्रम दोन मध्ये ठेवण्यात आले आहे.या विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी रुग्णालयाकडून खास डॉक्टर व नर्स नेमण्यात आल्या आहेत. उपचारार्थ दाखल विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले.

Back to top button