NCP : परळीच्या वैजनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षांसहीत ५ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश - पुढारी

NCP : परळीच्या वैजनाथ कारखान्याच्या उपाध्यक्षांसहीत ५ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड, पुढारी ऑनलाईन : परळीमध्ये राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे परळी तालुक्यात भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीने मोठा धक्का दिलेला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, “आज या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत. २०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखतं. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आलिशान घर बांधले जात आहे, याची देशाला खरंच गरज आहे का?”, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, “मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असून शेतीमालाचे मोठे नुकसान झालं आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसान भरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेलं”, असा दिलासा जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

Back to top button