

रत्नागिरी; विशाल मोरे : रत्नदुर्ग किल्ल्यावरील कड्यावर फिरण्यासाठी आलेला एकजण पाय वाटेवरून तोल गेल्याने पडून कड्याच्या दिशेने घरंगळत जाऊन मधोमध अडकला.
मदतीसाठी ओरडणारा या व्यक्तीकडे तेथे फिरण्यासाठी आलेल्या अन्य व्यक्तींचे लक्ष जाताच त्यांनी याची माहिती तेथील स्थानिकांना दिली. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व कोस्टल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने वर खेचत त्याची सुटका केली.
हा प्रकार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. येथे फिरण्यासाठी आलेली एक व्यक्ती कड्याच्या दिशेने जाणाऱ्या पाय वाटेवरून जात असताना तोल जाऊन पडली. उतारावरून सुमारे तीस फूट घरंगळत जात ती पायवाट आणि कडा यामधील भागात अडकली.
जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या या व्यक्तीकडे तेथे फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांचे लक्ष गेले. त्यांनी स्थानिकांना याची माहिती दिल्यावर त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसही लगेचच घटनास्थळी दाखल झाले.
कोस्टल विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दोरीने खाली उतरत अडकलेल्या व्यक्तीला दुसरी दोरी बांधून त्याला वरती खेचले.
भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला सर्वांनीच धीर दिला. स्थानिक ग्रामस्थ सतीश तळेकर, संदेश कीर, ओजस कीर, तेज कीर, सुयश तळेकर, दशरथ कवडे, साहिल मोंडकर यांनी त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात पोलिसांना सहकार्य केले.