

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : पूर्वी लोक लिटरमध्ये पेट्रोल डिझले भरायचे, आता मीटर पाहून भरतात. इंधन दरवाढ अशीच चालू राहिल, पेट्रोल 200 रुपये तर घरगुती गॅस 1600 रुपये होईल, लिहून ठेवा… असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, गांधी भवनात सोमवारी (दि.27) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा काँग्रेसच्या लोक कलावंत सांस्कृतिक सेलच्यावतीने गांधी भवनात आयोजित बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, शहराध्यक्ष सीमा थोरात, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, लोक कलावंत सेलचे अध्यक्ष एकनाथ त्रिभुवन, हमद चाऊस, पंकज ठोंबरे, मुजफ्फर पठाण, मुदस्सीर अन्सारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, अब की बार मोदी सरकार म्हणत सर्वसामान्यांनी सत्ता दिली, त्यांनीच मानगुटीवर वार केला आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. आता मनपा निवडणुकीत या लोकांची जिरवण्याची चांगली संधी आली आहे. लोक कलावंतांनी समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजीतून तर्री गायब
इंधन, गॅस दरवाढीबरोबरच तेलाचेही भाव आकाशाला भिडले आहे. एक लिटर तेलाचा दर आता दुप्पट झाला आहे. काँग्रेसच्या काळात भाजीमध्ये तर्री दिसायची. आता चमचाभर तेलाने फोडणी देण्याची वेळ आणली आहे. भाजीतून तर्री गायब करण्याचे काम या मोदी सरकारने केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.