भारत सीमेवर चीन ने पुन्हा ठोकले तंबू! ठिकाणांवर नवे सैन्यतळ | पुढारी

भारत सीमेवर चीन ने पुन्हा ठोकले तंबू! ठिकाणांवर नवे सैन्यतळ

लेह (लडाख) : वृत्तसंस्था

भारताला लागून असलेल्या सीमेवर चीन पुन्हा एकदा लष्करीद‍ृष्ट्या सक्रिय झाला आहे. 17 महिन्यांपूर्वी गलवान खोर्‍यात दोन्ही देशांतील सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक धुमश्‍चक्रीनंतर चीन पुन्हा एकदा वास्तविक नियंत्रण रेषेलगत आपल्या लष्करासाठी बंकर उभारू लागलेला आहे.

एका गुप्‍तवार्ता अहवालानुसार, चीनने पूर्व लडाखसमोर वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 8 ठिकाणांवर नवे अस्थायी तंबू ठोकलेले आहेत. सैनिकांच्या निवासाची परिपूर्ण व्यवस्था केली आहे.

गतवर्षी एप्रिल-मेमध्ये भारत-चीनदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर चीनने वेळोवेळी अनेक तळ तयार केले आहेत. त्याव्यतिरिक्‍त आता ‘वहाब जिल्गा’, पीयू, हॉट स्प्रिंग्स, छांग ला, ताशिगाँग, मान्जा आणि चुरूपर्यंत नवे तळ ठोकले आहेत. हे नवे तळ आधीच अस्तित्वात असलेल्या तळांव्यतिरिक्‍त बनविण्यात आले आहेत. यातूनच चीनचा इरादा काय आहे, ते सिद्ध होते. द्विपक्षीय चर्चा आणि सीमेवर शांततेच्या कितीही गप्पा संयुक्‍त राष्ट्रांसारख्या जागतिक व्यासपीठांवरून चीन मारत असला, तरी चीनला भारताला लागून असलेल्या सीमेवर आपले लष्कर दिवसेंदिवस वाढवतच न्यायचे आहे, हे लक्षात येते.

दोन्ही देशांचे 50-50 हजार सैनिक

भारत आणि चीनदरम्यान झालेल्या विविध स्तरांवरील चर्चांनंतर दोन्ही बाजूंनी काही ठिकाणांवरून व काही प्रमाणात सैन्य माघार झालेली असली, तरी भारताने चीनच्या आश्‍वासनांवर विसंबून एकदाही आधी सैन्य माघार घेतलेली नाही. जितके माघारी चीन सरकला, तितकेच माघारी नंतर भारत सरकलेला आहे. चीनने जेवढे सैनिक मागे बोलावले, तेवढेच भारतानेही त्या-त्या प्रसंगांतून मागे बोलावले आहेत.

या क्षणालाही पूर्व लडाखलगतच्या सीमा रेषेवर दोन्ही देशांचे प्रत्येकी 50-50 हजार सैनिक तैनात आहेत. हॉवित्झर, रणगाडे, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रेही दोन्ही बाजूंनी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप सैनिकांच्या बदल्याही दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. जुन्या सैनिकांना विश्रांती देणे, अन्य तैनाती देणे आणि नव्या दमाचे सैनिक येथे आणणे, असे दोन्ही बाजूंनी सुरू आहे.

हवाईतळ केले अद्ययावत

चीनने लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमेला लागून असलेल्या भागात अनेक हवाईपट्ट्या, हेलिपॅड बनवलेले आहेत. चीनने होतान, कश्गार, गरगुनसा, ल्हासा-गोंग्गर आणि शिगात्से या हवाईतळांचे अद्ययावतीकरणही केले आहे.

Back to top button