शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी भाजपाने पुढाकार घ्यावा : रामदास आठवले | पुढारी

शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी भाजपाने पुढाकार घ्यावा : रामदास आठवले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य, त्यावर व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया बघता हे भाजप आणि शिवसेना युतीचे संकेत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आपण वारंवार भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावे  हीच मागणी करीत होतो, असेही ते नागपूर विमानातळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शिवसेना आणि भाजपाने एकत्र यावे हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत राहून फायदा नाही. त्यांनी भाजपसोबत यावे असे आवाहन मी यापूर्वीही केले आहे. आता संकेत मिळत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करावी. या दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन सरकार स्थापन करावे. त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असे मत रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

शिवसेनेने भाजपासोबत सरकार स्थापन करावे असे वाटणारे अनेक आमदार शिवसेनेत आहेत. त्यांना भाजपासोबत जावे असे वाटते. म्हणून आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. मी नेहमीच यांच्या संपर्कात असतो. मी माझी भूमिका मांडली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही भाजप नेत्यांनी सुद्धा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आठवले म्हणाले.

शिवसेना व भाजपाचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकते. मी फडणवीस यांना भेटून त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद मिटला पाहिजे. शिवसेना या सरकारमधून बाहेर पडेल आणि नवीन सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

Back to top button