पुणे : लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेले बाळ केले गायब | पुढारी

पुणे : लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेले बाळ केले गायब

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एका कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लिव्ह इन रिलेशनमधून सहमतीने ठेवलेल्या शरिसंबंधातून तरुणी आई झाली. दोघांनी बाळाला जन्माला घातले. बाळाचा जन्म झाल्यानंतर घरचे लगेच दोघांना स्वीकार करणार नाहीत म्हणून तरुणाने बाळाला काही दिवस अनाथ आश्रमात ठेवण्याचा बहाणा करून गायब केले. या घटनेला आता अडीच वर्षाचा कालावधीत लोटला आहे. तरुणीने वारंवार त्याच्याकडे बाळाबाबत विचारणा केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत राहिला. शेवटी तीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी, एका 25 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुणीचा प्रियकर शुभम महेश भांडे ( वय. 23, रा. वडगाव शेरी ) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे ( वय. 26, रा.मांजरी ) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना 20 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी शुभम भांडे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे दोघांची ओळख होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. 2017 पासून दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यातून फिर्यादी तरुणी प्रेगनंट राहीली. याबाबत तिने शुभम माहिती दिली. त्यावेळी त्याने हे मुल माझेच आहे. तु काळजी करु नको मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे सांगितले. वैद्यकीय तपासणी करण्याच्यावेळी शुभम याने फिर्यादीसोबत पती म्हणून नाव लावले.

अनाथ आश्रमात ठेवतो म्हणत मुल केले गायब

14 मार्च 2019 मध्ये फिर्यादी तरुणीने ससून रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर दोघे मुलाला घेऊन केशवनगर मुंढवा येथील भाड्याच्या खोलीत आले. फिर्यादी तरुणीने शुभम याला याबाबत घरी सांगण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या घरचे दोघांना स्वीकारणार नाहीत असे म्हटले. त्यामुळे तो जन्म दिलेल्या मुलाला आश्रमात ठेवणार असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादीने त्याला नकार दिला होता.

फिर्यादीचे काही न ऐकता शुभम व त्याचा मित्र योगश काळे या दोघांनी 27 मार्च 2019 रोजी सकाळी अकराच्या सुमारास खोलीवर येऊन बाळाला आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. काही वेळानंतर शुभम याने घरी येऊन बाळाला आश्रमात दिल्याचे सांगितले. त्यानंतर अनेकदा फिर्यादी तरुणीने शुभम याच्याकडे बाळाच्या बाबतीत वारंवार विचारणा केली.

मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन बाळ कोठे दिल्याचे सांगितले नाही. त्यामुळे फिर्यादी तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली.

Back to top button