बीड : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मविआसह स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन | पुढारी

बीड : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मविआसह स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन

केज; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज केज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन रेड्याला देऊन सरकारचा व विमा कंपनीचा निषेध नोंदविण्यात आला.

सोयाबीन पिकाला ८०% पीक विमा लागू करावा, पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, ई-पीक पाहणी व नुकसानीची माहिती मोबाईल वरून ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, या मागण्यांसाठी केज येथे छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वाभिमानीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, किसन कदम, कपिल मस्के, भाऊसाहेब गुंड, अशोक गित्ते, सुधीर चौधरी, महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात भागवत पवार, जमील पटेल, मुकुंद कणसे, दलील इनामदार, समीर देशपांडे, विनोद शिंदे, वसंत भांगे, विश्वास जाधव, युवराज मगर, बंडू इंगळे आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांऐवजी रेड्याला दिले मागण्यांचे निवेदन

आंदोलनात सरकार आणि विमा कंपन्यांचा निषेध करण्यासाठी दोन रेड्यांना आणले होते. आंदोलकांनी सरकार आणि विमा कंपन्यांवरील रोष व्यक्त करण्यासाठी मागण्यांचे निवेदन सरकारी अधिकाऱ्यांऐवजी रेड्याला दिले. तसेच स्वाभिमानी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने गोंधळ्याचा वेष परिधान करून सरकार आणि विमा कंपन्यांच्या नावाने गोंधळ घातला.

हेही वाचा :

Back to top button