हिंगोलीच्या दसरा महोत्सवाला १६८ वर्षांची परंपरा; उद्या होणार ५१ फुटी रावणाचे दहन (Video) | पुढारी

हिंगोलीच्या दसरा महोत्सवाला १६८ वर्षांची परंपरा; उद्या होणार ५१ फुटी रावणाचे दहन (Video)

हिंगोली, गजानन लोंढे : म्हैसुरनंतर हिंगोलीचा दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. तब्बल १६८ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या दसरा महोत्सवात बुधवारी (दि.५) रोजी रात्री १० वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी तब्बल ५१ फूटी रावणाचे दहन करण्यात येणार असून भरत भेटीच्या कार्यक्रमाने येथील दसरा महोत्सवाची सांगता होणार आहे.

हिंगोलीत १८५५ मध्ये खाकीबाबा मठाचे महंत मानदास बाबा यांनी छोटेखानी रामलिला आयोजित करून दसरा महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा उत्तर भारतीय कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण केले जात असे. कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या मानदास बाबा यांचे भक्‍त संपूर्ण भारतभर पसरलेले असल्यामुळे त्यांचे नेहमीच उत्तर भारतात येणे-जाणे होते. त्यातूनच त्यांनी दसर्‍याची ऐतिहासिक परंपरा हिंगोलीत सुरू केली. निजाम राजवट असतानाही त्यांनी सुरू केलेल्या या दसरा महोत्सवाची देशभरात किर्ती पसरली. अखंडपणे सुरू असलेल्या या महोत्सवात बुधवारी रात्री १० वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी होणारी आतिषबाजी पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात.

गुरूवारी होणार ५१ फुटी रावणाचे दहन

रामलीलेमधील रावणवधाचा प्रसंग सादर होऊन त्यासोबत रावण दहनाच्या कार्यक्रमास सुरूवात होणार आहे. भव्य आतिषबाजी करीत गरूवारी रावण दहन होणार आहे. पंधरा दिवसांपासून शुर्पनखा, हनुमान, रावणाच्या भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू होते. यावर्षी तब्बल ५१ फूटी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. हा सोहळा रामलीला मैदानावर पार पडणार असून गुरूवारी भरत भेटीच्या कार्यक्रमाने येथील दसरा महोत्सवाची सांगता होणार आहे.

कृषी व औद्योगिक प्रदर्शन

सुरूवातीला दसरा महोत्सवात रामलीलेसह रावण दहनाचा कार्यक्रम होत असे. त्यानंतर १९७५ पासून येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर कृषी व औद्योगिक प्रदर्शन सुरू करण्यात आले. यामध्ये देशभरातील व्यापारी सहभाग नोंदवितात. रहाट पाळणे व इतर खेळांच्या दुकानांनी मैदान पंधरा दिवस बहरते. १६८ वर्षाची परंपरा असलेल्या या दसरा महोत्सवात रामलीला, भरत भेट व रावण दहन कार्यक्रम महत्वाचा आहे.

हेही वाचा :

Back to top button