गोदावरी नदीला महापूर, सर्व धरणे तुडुंब | पुढारी

गोदावरी नदीला महापूर, सर्व धरणे तुडुंब

परभणी; पुढारी वृत्तसेवा : सोमवारपासून होत असलेल्‍या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीला महापूर आल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.

जिल्ह्यात रविवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून झालेल्या धुवांधार पावसाने गोदावरी नदीला महापूर आला आहे. दुधना व पूर्णा नदीलाही महापूर आला आहे. जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना ही मोठी धरणे भरली गेली आहेत. याशिवाय ढालेगाव, तारूगव्हाण, मुदगल, डिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज (मंगळवार) पहाटेपर्यंत जोरदार सुरू होता. त्यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. धरणे, उच्च पातळी बंधारे, मध्यम प्रकल्प व साठवण तलाव इत्यादींमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने छोट्या नदी-नाल्यांना ही पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी पूर्णा व दुधना या नद्यांसह आणि उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

गंगाखेड येथील जनजीवन विस्कळीत…

गंगाखेड येथील गोदावरी नदीला महापूर आला असून, एकाच दिवसात 760 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार आगमनाने जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प 76 टक्के एवढा भरला असून, लघु व मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.

तालुक्यातील सायाळा सुनेगाव येथील इंद्रायणी नदीला महापूर आल्याने आजूबाजूच्या जवळपास पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र नद्यांना आलेला महापूर पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसत असून काहीजण स्‍टंटबाजी करताना दिसत आहेत.

Back to top button