'एटीएस'च्या कारवाईविरुद्ध निदर्शने करणारे ‘पीएफआय’च्या चौघांना केले स्थानबद्ध | पुढारी

'एटीएस'च्या कारवाईविरुद्ध निदर्शने करणारे ‘पीएफआय’च्या चौघांना केले स्थानबद्ध

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद विरोधी पथकाने पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कारवाईविरुद्ध निदर्शने करणाऱ्या 14 जणांना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि शहर पोलिसांनी संयुक्तरित्या कोम्बिंग ऑपरेशन राबवून मंगळवारी (दि. 27) पहाटे उचलले होते. यातील रेकॉर्डवरील चौघांना सीआरपीसी कलम 151 (3) नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यांना न्यायालयाने 6 ऑक्टोबरपर्यंत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश न्या. एस.पी. बेदरकर यांनी मंगळवारी (दि. 27) दिले.

मुनीर अहेमद सलीम अहेमद (34, रा. मुजीब कॉलनी, रोशनगेट), शफीउल्ला खान अफरुल्ला खान (31, रा. गल्ली नं. 6, रहेमानिया कॉलनी), मोहंमद मोहसीन मोहंमद इसाक (34, गल्ली क्र. 3, किराडपुरा), महंमद साबेर अब्दुल खालेद (34, रा. सी-११, संजयनगर) अशी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केलेल्या चौघांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांनी दिली.

22 सप्टेंबरच्या रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) देशभर कारवाई करीत पीएफआयच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली होती. औरंगाबाद एटीएसनेदेखील पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २ आॅक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एटीएसच्या या कारवाईविरुद्ध पीएफआय व एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी जिन्सी भागात निदर्शने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एटीएस आणि एकूणच यंत्रणेविरुद्ध घोषणाबाजी करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आयबीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्यांनी अटकेतील आरोपींची चौकशी करून पीएफआय आणि एसडीपीआय संघटनेत कार्यरत सक्रिय कार्यकर्त्यांची यादी बनविली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने राज्यभर त्यांची धरपकड मोहीम राबविली. महाराष्ट्रात औरंगाबादमधून सर्वांधिक 14 जणांना उचलण्यात आले होते. त्यांना जिन्सी ठाण्याचे निरीक्षक राजेश मयेकर, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे यांच्यासह पथकाच्या बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्षाकडून अॅड अमेर काजी यांनी बाजू मांडताना राजेश रामराव राऊत विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला देत चारही आरोपींना 15 दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण घेत सहा ऑक्टोबरपर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा :

Back to top button