महाराष्ट्र राज्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा | पुढारी

महाराष्ट्र राज्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याला गडकिल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विषयक प्रसिध्दी मोहीम, पर्यटनाबाबत सामंजस्य करार, पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, गायक शंकर महादेवन व अमृता फडणवीस यांनी गायलेल्या महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर,पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यासह पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, यंदाचे पर्यटन हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर पर्यटनाला नवे दिशा देणारे ठरावे यासाठी ‘पर्यटन- नवा विचार, नवी दिशा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यही पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण एक आंतरराष्ट्रीय पर्यटक हा नऊ जणांना रोजगार देतो. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी शासन आपल्या पाठीशी आहे. आपल्या काही नवकल्पना असतील आणि पर्यटन क्षेत्रात त्या आणण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. गणेशोत्सव कालावधीत परदेशातील महावाणिज्य दूत यांना दर्शन घडविण्यात आले या उपक्रमातूनही एक चांगला संदेश परदेशी लोकांपर्यत जात असतो. पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि समावेशक पर्यटन स्वीकारून राज्यातील पर्यटनाची परिभाषा अद्यान्वयित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पर्यटनमंत्री लोढा म्हणाले.

मुंबईतील 75 व्हिडिओ’ लाँच

मुंबई व्हिडिओ मालिका प्रकल्पामध्ये लोकप्रिय आणि पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठिकाणांभोवती हे चित्रीत करण्यात आले आहेत. स्थानिक तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळांना महत्त्व देणारी पर्यटन स्थळे यात समाविष्ट आहेत. मुंबईतील 200 पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर याचे व्हिडीओ साप्ताहिक पोस्ट केले जातील.

अनलिमिटेड महाराष्ट्र पॉडकास्टसह ‘कानोदेखी’ लाँच

पॉडकास्ट हे पर्यटनाला चालना देणारे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. पर्यटनाचा कायापालट करण्याचा एक भाग म्हणून, ‘अनलिमिटेड महाराष्ट्रासह कानोदेखी’ ही मालिका रेडिओ सिटी ९१.१ एफएमवर साप्ताहिक ६ महिन्यांसाठी प्रसारित केली जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भाग दाखवले जाणार आहेत.

शहरातील 7 माहिती पुस्तकांचे उद्घाटन

देशी-परदेशी पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने पर्यटन स्थळे म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची माहितीपत्रके तयार केली असून ही माहितीपत्रके संबंधित शहरातील निवडक हॉटेल्समध्ये ठेवल्या जातील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, सूत्रसंचालन कल्पना साठे, आभार मिलिंद बोरीकर यांनी मानले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा;

Back to top button