गडचिरोली : ट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त नागरिकांनी जाळले १० ट्रक | पुढारी

गडचिरोली : ट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त नागरिकांनी जाळले १० ट्रक

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा; सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली. ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली.

मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात असताना लगाम-शांतीग्राम गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांना लोहखनिज घेऊन येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सुभाष जयदार यांची पत्नी बिजोली सुभाष जयदार (४५) या जागीच ठार झाल्या. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी रस्त्याने लोहखनिज घेऊन येणाऱ्या आठ ते दहा वाहनांना आग लावली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, परिसरात तणाव कायम आहे.

सुरजागड येथील डोंगरावरुन त्रिवेणी अर्थमूव्हर्स आणि लॉयड मेटल्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. या खनिजाची वाहतूक टिप्पर आणि ट्रकद्वारे होत असून, दररोज चारशे ते पाचशे ट्रक रस्त्यावरुन धावत असल्याने आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-एटापल्ली हे दोन प्रमुख रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या विरोधात मागील आठवड्यात अहेरी आणि आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली होती. परंतु प्रशासनाने लोकभावना लक्षात न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा;

Back to top button