नांदेड, पुढारी वृत्तसेवा : Ganesh Chaturthi 2022 : आबाल वृद्धापासून सर्वांचे लाडके दैवत, विद्येची देवता म्हणून लौकिक असणार्या गणरायाचा उत्सव जवळ येवून ठेपला आहे. पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत सामाजिक भावनेतून शहरातील हनुमानपेठ (वजिराबाद) येथील रेडिमेड कपड्याचे व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते इंदरजीत प्रेमचंदनानी यांनी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीसाठी आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे या मूर्तींची किंमत त्यांनी ठरविली नाही, गणेश भक्तांनी मूर्ती घ्यावी व त्यांना वाटेल तेवढी किंमत त्यांनी समोर ठेवलेल्या पेटीत टाकावी, असा उपक्रम त्यांनी राबविला आहे. यात जमा होणारी सर्व रक्कम गोसंवर्धनासाठी गोशाळेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य चळवळीला गती यावी, म्हणून सार्वजनिकपणे सुरू झालेला हा गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरात आणि मनात रुजला. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या गणेशमूर्ती मूर्ती अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी पाण्यात आणि जमिनीत नष्ट न होणार्या अत्यंत अपायकारक अशा रसायनाचा वापर केलेले रंग वापरण्यास सुरुवात झाली.
मागील 15 ते 20 वर्षांपासून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून नागरिक सुद्धा खूप जागरूक झाले आहेत. याच जाणिवेतून नांदेड येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते इंदरजीत प्रेमचंदनानी यांनी कोलकात्याहून आणलेल्या शाडू मातीच्या अत्यंत सुबक आणि बाळ गोपाळांना आवडणार्या गणेश मूर्ती आपल्या दुकानात ठेवल्या आहेत. मूर्तीची किंमत निश्चित केलेली नसून, मूर्ती घेणार्यांनी त्याला वाटतील तेवढे पैसे पेटीत टाकावेत व मूर्ती घेऊन जावी. फक्त अट एकच की मूर्तीचे विसर्जन कुठल्याही नदीत किंवा विहिरीत न करता घराच्या अंगणात करावे किंवा ज्यांच्याकडे अंगण नसेल त्यांनी घरीच बादलीत पाण्यात विसर्जन करावे. ती विसर्जित माती झाडांना टाकावी. निसर्गाकडून जे घेतलेले आहे ते नैसर्गिकरीतीने निसर्गाला परत करावे, असा यामागचा उद्देश आहे.
म्हणाल तर हा संदेश खूप छोटा आहे आणि म्हणाल तर यातच जीवनाचं सारदेखील आलेलं आहे. दुसरं म्हणजे गणेश मूर्तीची जी रक्कम पेटीत जमा होईल, ती सर्व रक्कम गोशाळेला समर्पित भावनेने देण्याचा निर्णय इंदरजीत प्रेमचंदनानी यांनी घेतला आहे. आपला व्यवसाय करत करत सामाजिक उपक्रम तन, मन, धनाने राबविणारे प्रत्येक शहरात आहेत, गरज आहे अशा बाबतीत समाजाचा सहभाग वाढविण्याची. चला तर मग बसवू या पर्यावरण पूरक बाप्पाला आणि निसर्ग सुद्धा आपल्याला देईल भरभरून आशीर्वाद!. (Ganesh Chaturthi 2022)
हे ही वाचा :