पुढारी ऑनलाईन डेस्क : गणेशोत्सव अगदी समीप आला असून 31 ऑगस्टला तुमच्या आमच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बापाच्या आगमनापासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव लोक अतिशय आनंदात साजरा करतात. त्यानंतर दहा दिवस लोक बाप्पाची स्थापना करून मनोभावे पूजा करतात. दहाव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. पण तुम्हाला बाप्पाच्या जन्माची सुरस कथा माहिती आहे का ? चला तर मग जाणून घेऊया गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला.
माता पार्वतीच्या मळापासून झाला मंगलमूर्तीचा जन्म
शिवपुराणानुसार गणपती बाप्पाचा जन्म देवी पार्वतीने अंगावर लावलेल्या हळदीची पेस्ट म्हणजेच मळापासून झाला. अंगावर लावलेली हळद काढून एके ठिकाणी गोळा केली. या गोळ्याला बाळाचा आकार दिला आणि त्यात चैतन्य ओतलं. अशा प्रकारे तुमच्या आमच्या लाडक्या गणपतीचा जन्म झाला. यानंतर मैत्रिणींसह आंघोळीला जात असलेल्या माता पार्वतीने बाप्पाला सांगितले, की तुम्ही दारात बसा आणि कोणालाही आत येऊ देऊ नका. अशाप्रकारे बाप्पा पार्वतीमातेसाठी द्वारपाल बनले.
काही वेळाने महादेव घरी आले आणि पार्वतीच्या कक्षात जाऊ लागले. पण दारात असलेल्या श्रीगणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. एक लहान मुलगा आपल्याला पत्नीच्या कक्षात जाऊ देत नाही हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले. त्यांनी गणेशाला समज देऊन पाहिली. पण मातृभक्त गणपती त्यांना काही आत जाऊ देण्यास तयार होईना. यावर क्रोधित झालेल्या शंकरांनी स्वत: च्या मुलाचा म्हणजेच गणपती बाप्पाचा शिरच्छेद केला.
हे घडलं आणि त्याच क्षणी पार्वती तिथे प्रवेश करती झाली. यानंतर जेव्हा माता पार्वतीने आपल्या मुलाला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्या दुःखी झाल्या. देवी भोलेनाथला म्हणाल्या की, माझ्या मुलाचे शीर का कापले? महादेवाने विचारले हा तुझा मुलगा कसा असू शकतो. त्यानंतर पार्वतीने गणेशजन्माची त्याला संपूर्ण कथा सांगितली आणि विलाप करत मुलाचे मस्तक परत आणण्यास सांगितले. पत्नीचा विलाप पाहून शंकरांनी गणपतीच्या धडाला दुसरं मस्तक बसवण्याचा निर्णय घेतला. या मस्तकाच्या शोधात त्यांनी गरुडाला उत्तर दिशेला जायला सांगितले.
पण यासाठी त्यांनी गरुडासमोर अशी अट ठेवली की जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, अशा मुलाचे डोके घेऊन या. गरुडजी बराच वेळ भटकले पण त्यांना अशी कोणतीही आई किंवा मूल सापडले नाही. शेवटी त्यांना एक हत्तीण दिसली जी तिच्या बाळाकडे पाठ करून झोपलेली होती. गरुडाने त्या हत्तीणीच्या बाळाचे मस्तक आणले. त्यानंतर महादेवाने ते मस्तक गणेशाच्या शरीराला जोडले आणि त्यात त्याने प्राण ओतला. माणसाचे शरीर असलेला पण हत्तीचे शिर असलेल्या बाप्पाला यावेळी गजमुख, गजानन, गजोवदन हे नवीन नाव मिळालं.