भाविकांचे श्रध्दास्थान परळीतील ‘बोंबल्या गणपती’ | पुढारी

भाविकांचे श्रध्दास्थान परळीतील ‘बोंबल्या गणपती’

बीड : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात विविध शहरे, पुरातन देवस्थाने आणि ग्रामीण भागातील लिंबागणेश, नवगण राजूरी, पिंपळनेर (गणपतीचे) अशा गावांमध्ये गणेशाची ऐतिहासिक मंदिरे आहेत. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगमुळे मोठे महत्त्‍व प्राप्त झालेल्या परळी शहर आणि परिसरात गणेशाची अनेक मंदिरे आहेत. येथे वैद्यनाथ मंदिराच्या बाजूला टिंबे गणपती तर संत जगमित्र नागा मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारात असलेल्या गणपतीला बोबल्या गणपती म्हणून ओळखले जाते.

बोंबल्‍या गणपती नावाबाबतची आख्‍यायिका

बोंबल्या गणपती या नावाबाबत आख्यायिका सांगितली जाते ती अशी, जेव्हा गणेशाचा उपनयन संस्कार झाला. त्यावेळी भगवान शंकराला खूप आनंद झाला. त्यानंतर ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी गंगाभागीरथी व महादेव हे ध्यानस्त आहेत हे पाहून पूर्ण धन्वंतरी परळी व्यापून टाकत होती. आपले अस्‍तित्‍व महादेवासोबत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. हे गणेशाच्या लक्षात आले तेव्हा गणेशाने तोंडावर हात ठेवून बोंब मारण्यास सुरूवात केली. यावेळी महादेवाच्या दारापर्यंत पाण्याचा ओघ आला व त्यांचे ध्यान आणि अस्तीत्व धोक्यात आले. हे गणेशाच्या लक्षात आल्यानंतर पार्वती मातेचे भगवान शंकरासोबतचे अस्तित्व लुप्त होईल म्हणून गणेश ओरडले. त्या आवाजाने शंकर भगवान ध्यानातून बाहेर आले.

आपला मुलगा का ओरडतो हे त्यांनी पाहिले. तेव्हा गंगा आपले ध्यान भंग करत होती, हे महादेवाने पाहिले. त्यांनी गणेशाच्या हाकेला साद घालून गंगा अदृष्य (गारगोटी) रूपात वैद्यनाथाच्या मंदिरात लुप्त केली. ही गारगोटी आजही कुबेर मंदिराजवळ आहे. गणपती शंकर पार्वतीसोबत आजही परळीत आपल्या रूपात भक्तांना दर्शन देतात. बोंबल्या गणेश श्री जगमित्र नागा मंदिरासमोरील बाजूस आहेत. आख्यायिकेनुसार तेव्हापासून येथील गणपतीचे नाव बोंबल्या गणपती पडल्याचे सांगण्यात येते. हा गणपती परळी शहरातील भाविकांवरील विघ्न टाळतो अशी परळीतील भाविकांची श्रध्दा आहे.

विसर्जित न होणारा गणपती

परळी शहरातील गणेपार भागातील मंदीरात प्रत्येकवर्षी गणेश चथुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते. स्थापनेच्या दिवशीच ती गणेशमूर्ती कोणत्याही एका भाविकाच्या ओटीत टाकली जाते. ज्याच्या ओटीत गणपती दिला जातो. त्याने पुढील वर्षी गणेश स्थापनेची जबाबदारी घ्यायची असते. यामुळे येथील गणपती विसर्जीत केला जात नाही.

 

Back to top button