औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत मानले जाते. नवसाला पावणारा स्वयंभू विघ्नहर्ता अशी ओळख. येथील शिवजयंती असो…रामनवमी असो… किंवा होलिका दहन. प्रत्येक उत्सवाची सुरुवात या मंदिरापासूनच होते. इतकेच नव्हे तर, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातही या मंदिरात उत्सवमूर्तींची प्राणप्रतिष्ठा व महाआरतीनंतर होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही शहरवासियांनी जपली आहे.
औरंगाबादेतील श्री संस्थान गणपतीचे दर्शन घ्यायला लोकमान्य टिळक आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका जिंकण्याबाबत संस्थान गणपतीला नवस बोलला होता. सोन्याचा मुकुट अर्पण करून त्यांनी हा नवस फेडला होता. अशी ख्याती असलेला संस्थान गणपती शहवासियांचे आराध्यदैवत आहे. १९८३ मध्ये संस्थान गणपती मंदिराचे ट्रस्ट स्थापन झाले. श्री संस्थान गणेश मंडळाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचा गणपती असतो. मंडळांमध्ये सर्वात आधी येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. अनंत चतुर्दशीलाही विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ येथूनच होतो. विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून राबविले जातात. यंदा गणेशोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरणपूरक म्हणून ६० किलो तुरटीपासून बनलेली श्री गणेशमूर्तींची स्थापना मंदिरात केली जाणार असल्याचे विश्वस्त प्रफुल मालानी यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?