नांदेड, पुढारी वृत्तसेवा : 'चव्हाण साहेब घरात आहेत का,'असे विचारत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेत त्यांच्या घराच्या केबिनची काच फुटली. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून ती मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.
अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक झाल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्ह्यातील अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. तक्रारी स्वीकारण्यासाठी 'आनंद निलयम' निवासस्थानी एक कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
येथे काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी येथे समजावून घेतल्या जातात.
बुधवारी सकाळी दिव्यांगांसाठी असलेल्या एका तीन चाकी सायकलवरून एक मनोरुग्ण महिलेने गेटसमोर उभे राहून आतील कर्मचाऱ्यांना 'चव्हाण साहेब आहेत का', असे विचारले.
सध्या अशोक चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत वास्तव्यास असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी 'साहेब नाहीत', असे आतूनच उत्तर दिले.
या महिलेला आपली समस्या मांडावयाची असल्याने आणि ती मांडता आली नसल्याने महिला संतप्त झाली होती.
रागाच्या भरात तीने एक दगड निवासस्थानाच्या दिशेने भिरकावला. तो केबीनला लागल्याने काच फुटली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक पथक पोहचले.
त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. या मनोरुग्ण महिलेसोबत आणखी एक तरुणी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असल्याचे शिवाजीनगरचे ठाणेदार अनंता नरुटे यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमेलेल्या मंत्रीसमितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर प्रथम मराठा आरक्षणप्रश्नी दगडफेक झाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. दगडफेक करणारी महिला मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: