शुक्रवारपासून नागपुरात संघाची बैठक, रोडमॅप तयार केला जाणार | पुढारी

शुक्रवारपासून नागपुरात संघाची बैठक, रोडमॅप तयार केला जाणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारपासून नागपुरात संघाची बैठक : संघटन विस्तार, काेरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने, उत्तर प्रदेश निवडणूक यासह देशातील वर्तमान परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार, ३ सप्टेंबर पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशेष बैठकीला नागपुरात प्रारंभ होत आहे.
६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या बैठकीला संघ परिवारातील विज्ञान भारती, आरोग्य भारती, संस्कार भारती, उघु उद्योग भारती, स्वदेशी जागरण मंच, विश्व हिंदू परिषदेसह इतर सर्व संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्रात्रय होसबळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत संघटना विस्ताराचा आढावा घेण्यात येणार आहे. मुख्य बैठक ३ पासून सुरू होणार असली तरी २ सप्टेंबरपासून गटश: बैठकी होणार आहे.

शुक्रवारपासून नागपुरात संघाची बैठक

उद्या शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या सत्रात प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहे. त्या नंतर सर्वसमावेशक सत्रे घेण्यात येणार आहे. सोमवार ६ रोजी बैठकीचा समारोप हाेईल. काेरोना काळात संघाच्या शाखा रचनेत अनेक बदल झाले.
मैदानावरील शाखा बंद होऊन आॅनलाईन शाखा सुरू झाल्या. दुसरी लाट संपत असताना तिसऱ्या लाटेची भीती आहे. यासह इतर बाबींवर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रोडमॅप तयार केला जाणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत आगामी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीत संघ तसेच संघ परिवारातील संघटनांची भूमिका तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता कार्यक्रमांची आखणी याचा रोडमॅप तयार केला जाणार आहे.
सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे मागील महिन्यात लखनऊ येथे झालेल्या बैठकीनंतर नागपुरात येत आहेत.
लखनऊ येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
भाजपला संघाकडून निवडणुकीत नेमके कसे सहकार्य हवे आहे, यावर लखनऊ बैठकीत चर्चा झाली होती.
या बैठकीत संघ परिवारातील संघटनांत उत्साह पेरून त्या दिशेने कामाला लागण्याच्या सूचना केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचलं का?

Back to top button