राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर जवळच्या वडगांव पाटोळे, ता.खेड येथे बिबट्याने झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी (दि १) उघडकीस आली.
जनाबाई रामचंद्र पाटोळे (वय ६०) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नावं आहे. वडगांव पाटोळेमधील बोरदरा- साबळे वस्ती येथे ही महिला राहत होती. त्यांच्या भावाचे येथे घर असून जवळच असलेल्या झोपडीत महिला वास्तव्यास होती.
नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि ३१)रात्री झोपल्यावर मध्यरात्री बिबट्या झोपडीत शिरला.झोपेत असलेल्या जनाबाई यांना ठार केले. त्यांचे अर्धवट शरीर खाऊन तो निघून गेला. दुपारी कुटुंबातील सदस्यांनी चौकशी केली असता ही घटना समोर आली.
वडगांव पाटोळे परिसरात गेले तीन महिने बिबट्यांचा तसेच त्यांच्या बचड्यांचा वावर आहे. रस्त्यावर एका महिलेला अचानक आडवा आला. दुचाकी स्वारावर हल्ला चढवला. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यासारख्या अनेक घटना घडल्या होत्या.
यामुळे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण होते. लोकं दिवसा शेतात किंवा कामानिमित्त बाहेर पडायला घाबरत होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने एकदा पिंजरा लावला होता. त्यात एक बिबट्या अडकला. तरीही बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले होते. भीतीने नागरिकांना ग्रासलेले असताना आजच्या घटनेने चिंता वाढली आहे.
लांडगा आला रे..या गोष्टी प्रमाणे वडगांव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकजण सांगत होते.गेल्या दोन महिन्यात तीन नागरिकांवर जीवघेणा हल्ला झाला. बिबट्या आहे त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आजच्या पहिल्या नरबळीने तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे.
-सागर पाटोळे,माजी सरपंच,वडगांव पाटोळे, संचालक, राजगुरूनगर सहकारी बँक
हे ही वाचलं का?