उस्‍मानाबाद : किडनी देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखाचा गंडा | पुढारी

उस्‍मानाबाद : किडनी देण्याच्या बहाण्याने पावणे दोन लाखाचा गंडा

कळंब; पुढारी वृत्तसेवा : किडनी बहाण्याने गंडा : माझ्या खूप ओळखी आहेत. मी डॉक्टर आहे. तुमच्या मुलाला लागणारी किडनी सरकारी योजनेमधून मिळवून देतो, असे सांगून एका भामट्याने नात्यातीलच व्यक्तीस पावणेदोन लाख रुपयाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किडनी बहाण्याने गंडा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परमेश्वर संदीपान सुतार रा. बावी ता. वाशी यांचा मुलगा नितीनच्या दोन्ही किडनी मागील 3 ते 4 वर्षांपूर्वी खराब झालेल्या आहेत.

त्‍याच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात नियमितपणे डायलिसिस केले जात आहे. यांचे नातेवाईक व सर्वत्र डॉक्टर म्हणून मिरवत आसलेल्‍या प्रदीप चतुर्भुज सुतार रा. बार्शी जिल्हा सोलापूर येथील नातेवाईकाची भेट झाली.

त्‍यावेळी त्यांनी माझ्या खूप ओळखी आहेत. मी तुमचा मुलगा नितीन याच्यासाठी किडनी मिळवून देतो. तुमचा डायलेससिसचा होणारा त्रास वाचेल व मुलगा नीट होईल. सरकारी योजनेतून किडनी मिळेल. मात्र त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. मुलास किडनी मिळवून देतो असे बोलल्याने व आपला मुलगा नीट होईल. किडनी देणारे आपले नातेवाईकच आहेत.

आशेने 1 लाख 70 हजार रुपये दिले.

त्‍यामुळे मुलास किडनी मिळवून देईल या आशेने त्यांनी 2018 साली प्रदीप सुतार रा. बार्शी याला 1 लाख 70 हजार रुपये बार्शी येथे नेहून दिले. पैसे देऊन दोन ते अडीच वर्ष झाली तरी किडनी मिळाली नाही व फक्त देतो देतो असे उत्तर येऊ लागले.

त्‍यामुळे धीर सुटलेल्‍या मुलाच्या नातेवाईकांनी प्रदीपकडे आमच्याकडून घेतलेले आमचे पैसे परत देण्याची मागणी केली. यावेळी प्रदीपने तुझे कसले पैसे, तुमचे तुम्ही बघा. मला विचारू नका असे म्हणून शिवीगाळ केली. किडनी पण मिळाली नाही आणि किडनी मिळेल या आशेने दिलेले आपले पैसे पण परत मिळत नाहीत.

यामध्ये आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यामुळे परमेश्वर सुतार यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक फौजदार ठाकर हे करीत आहेत.

यातील संशयित आरोपी हा मी डॉक्टर आहे असे लोकांना सांगत असून, हा डॉक्टर आहे समजून लोक याला बळी पडतात. तो खरेच डॉक्टर आहे की नाही याबबत माहिती घेणे आवश्यक आहे. त्‍याचबरोबर मानवी अवयव तस्करी करणारी टोळी व या डॉक्‍टराचे काही धागेदोरे आहेत का? किडनी तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याचे नाकारत येत नसून याची चौकशी करून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा तपास होणे गरजेचे आहे अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

Back to top button