कुडाळ : पुढारी वृत्तसेवा भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळ शहरात दाखल झाली. यानंतर, ही यात्रा येथील शिवसेना शाखेसमोरून जात असताना शिवसेना शाखेसमोर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली.
आवाज कुणाचा शिवसेनेचा, झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी भाजपाच्या मोटरसायकल रॅली दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर जोरदार घोषणा बाजी केली.
त्याला शिवसैनिकांनीही घोषणाबाजी करीत जोरदार प्रत्युत्तर दिले. या यात्रे दरम्यान येथील शिवसेना शाखेसमोर पोलिस संरक्षण देण्यात आले होते, शाखेसह शहरात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कुडाळात दाखल झाली. यावेळी भाजपाने मोटरसायकल रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.
येथील शिवसेना शाखेसमोर भाजपा कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली दरम्यान जोरदार घोषणा बाजी केली. यत्याचवेळी शिवसैनिकांनीही जोरदार घोषणा बाजी केली.
त्यानंतर राणे यांच्या वाहनांचा ताफा शिवसेना शाखेसमोर येताच पुन्हा शिवसैनिकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद,
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, वैभव नाईक अंगार है, बाकी सब भंगार है, खासदार विनायक राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आमदार वैभव नाईक तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी राणे यांच्या समोरच शिवसैनिकांनी केली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, सचिन काळप, बाळा पावसकर, चेतन पडते, कृष्णा तेली, गोट्या चव्हाण, कृष्णा तेली, कृष्णा धुरी, योगेश धुरी, रूपेश पावसकर, राजू गवंडे, सुशिल चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, नितीन सावंत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
या यात्रे दरम्यान शिवसेना शाखेसमोर पोलिसांनी कडा करून शाखे समोर पोलिस संरक्षण वाढविण्यात आले होते. राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथकासह स्थानिक पोलिसांचे पथक तैनात ठेवण्यात आले होते.
त्यामुळे शाखेसमोर पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान राणे यांचे कुडाळात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संस्था यांच्या मार्फत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राणे यांनी संबोधित केले.
त्यानंतर ही यात्रा सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान येथील भाजपा कार्यालयासमोर तसेच शहरात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.