हातभट्टी तस्कराचा पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

हातभट्टी तस्कराचा पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : अवैध हातभट्टी दारूची तस्करी करणार्‍या कारने नाकाबंदी करणार्‍या पोलिसांच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री (दि. 27) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यासमोर घडला.

याप्रकरणी राम देविदास जाधव (वय 40), मुकुंद श्रीकुंभ जाधव (वय 25), अजय शिवाजी राठोड (सर्व, रा. बक्षीहिप्परगा तांडा, ता. उत्तर सोलापूर) व अनोळखी एक असा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राम जाधव व मुकुंद जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल धनराज केकाण यांनी फिर्याद दिली आहे.

केकाण हे पोलिस ठाण्यात सेवा बजावत असताना सपोनी शिवाजी जायपत्रे यांनी बक्षीहिप्परगा तांडा (ता. उत्तर सोलापूर) येथील हातभट्टी दारूच्या ट्युब घेवुन बोलेरो जीप (क्र. एमएच 12 एफवाय 2931) ही बार्शीत असल्याचे सांगितले.

पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने पानगाव (ता. बार्शी) येथे नाकाबंदी केली. पानगाव चौकात नाकाबंदी केली असताना बोलेरो गाडी सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात गेली. थांबण्याचा इशारा केला असता ती रस्त्याकडेने तशीच पुढे गेली. पोलिसांनी तिचा पाठलाग केला.

बार्शी पोस्टचौक पर्यत आल्यानंतर या चालकाने जीप कुर्डूवाडी रोडने घेवुन कुर्डूवाडी बायपास चौकातून बार्शी-लातूर बायपासला वळवली. त्यामुळे बार्शी पाठलाग करणार्‍याय पोलिसांनी कुडूवाडी – बार्शी मार्गावरील तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदारांना फोन करुन रोडवर नाकाबंदी करण्यास सांगितले.

पोलिस अमंलदार शेलार यांनी ठाण्यात हजर असणार्‍या पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, सुरेश बिरकले, शिंदे,महेश डोंगरे,आप्पा लोहार यांच्या मदतीने बॅरिकेट्स व ठाणे अंमलदार शेलार यांची स्वीफ्ट कार (क्र.एम. एच. 44/जी1670) लावून चालकास थांबण्याचा इशारा केला. पण बोलेरो चालकाने थांबविण्यासाठी उभे असलेले पोलिस अंमलदार शेलार यांच्या अंगावर जीप घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

शेलार यांनी समय सुचकता बाळगून बाजूला उडी मारुन जीव वाचविला. पण बोलेरो चालकाने रोडच्या कडेला उभी असलेली स्वीफ्ट कार (क्र. एमएच 44 जी 1670) हिला जोराची धडक दिली. पण धडकेनंतर गाडी रस्त्यायकडेला अडकून राहिल्याने गाडीतील चालक व इतर तिघे जण अंधाराचा फायदा घेत उतरुन पळून जावू लागले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पण पळताना दोघे आरोपी खड्यात पडून जखमी झाल्याने त्यांना पोलिसांनी पकडले. पण अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पाहणी केली असता बोलेरोमध्ये मधल्या व पाठीमागील शिटच्या जागी हातभट्टी दारुने भरलेल्या 60,500 रूपयांच्या हातभट्टी दारूच्या ट्युब मिळून आल्या.

अटक केलेल्यांची नावे राम जाधव व मुकुंद जाधव अशी असून त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी गाडीचा चालक अजय राठोड याने बक्षीहिप्परगा तांडा येथून भरून बार्शी येथे टाकणार होता असे सांगितले.

दरम्यान, आरोपीच्या बोलेरोने धडक दिल्याने पोलिस अमंलदार शेलार यांच्या स्वीफ्ट गाडीचे 55 हजाराचे नुकसान झाले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

दैव बलवत्तर म्हणूनच; अन्यथा…

हातभट्टीची दारू घेऊन जाणार्‍या बोलेरो गाडीची माहिती मिळताच पोलिसांनी सुरुवातीला पानगाव येथे नाकाबंदी केली; पण त्यांना न जुमानता चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली. यावेळी रस्त्यावर उभे असणारे पोलिस पटकन बाजूला झाले. त्यामुळे ते बचावले. तर कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील तालुका पोलिस ठाण्यासमोर लावलेले बॅरिकेडस् उडवलेच; पण त्याबरोबर रत्यावर आडवी लावलेली स्विफ्टसह अन्य वाहनांना उडवले. यावेळी समोर उभ्या असणार्‍या पोलिस अंमलदार शेलार यांनाही उडविण्याचा चालकाने प्रयत्न केला; पण शेलार यांनी तत्काळ रस्त्याकडेला उडी मारून जीव वाचविला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच शेलार वाचले; अन्यथा काहीही अनर्थ घडला असता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news