रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यात एन्ट्रीसाठी नियमावली जाहीर : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली तरी येणार्या गणोशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित रहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात एन्ट्रीसाठी नियमावली जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणार्या लोकांनी लसीचे दान डोस घेतले असतील तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. या चाचणीत ज्या व्यक्ती बाधीत आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल.
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी केलेली असल्यास प्रवेशावेळी प्रमाणपत्र सादर करावे. जिल्ह्यामध्ये येणार्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणार्या प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून एसटी गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहे. प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणार्या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारण्यात येतील. जेणेकरून वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल.
तसेच गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहिका व इतर यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्व. गणपती बसवण्यात येऊ नयेत असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
सार्व. गणपती बसवल्यास तो दीड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे. श्रीगणेश आगमन व विसर्जनवेळी मिरवणूक काढू नये, आरती, भजन,कीर्तन जाखडी या सारख्या कार्यक्रमांना गर्दी करण्यात येउ नये.
शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी.
सजावट करताना शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक, थर्माकोल, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करु नये व अशा मूर्तींचे विसर्जन घरगुती स्वरूपात करावे.
प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा,सुके पदार्थ,पूर्ण फळ याचा प्रसाद द्यावा.
मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
ध्वनिप्रदूषण टाळावे, नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे कार्यक्रमांना जाणे टाळावे.
विसर्जन घराच्या आवारात करावे, घरच्या घरी विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या तलाव, हौद यात गर्दी न करता विसर्जन करावे.
न.प., ग्रा. पं. यांच्यामार्फत गणेशमूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून गर्दी टाळणे शक्य होईल, असे आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचलं का?