बीड : मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला म्हणून आईचा खून | पुढारी

बीड : मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला म्हणून आईचा खून

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या आईचा खून केला होता. ही घटना सोमवारी परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.डी.कोचे यांच्यासमोर हजर केले असता दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपींचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील अनिता राठोड व वैजनाथ राठोड हे कुटुंब आठ दिवसापूर्वी तिरूपतीच्या बालाजी दर्शनासाठी गेले होते. आई-वडील देव-दर्शनासाठी गेल्यामुळे त्यांच्या तीन मुली घरीच होत्या. याच तांड्यावरील बबन चव्हाण एका अल्पवयीन मुलीस विनाकारण भेटून छेडछाड करत होता. दरम्यान, आई-वडील देवदर्शनाहून आल्यानंतर पीडित मुलीने हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर आई अनिता राठोड व वडील वैजनाथ राठोड यांनी बबन चव्हाण यास जाब विचारला. यावेळी त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली.

याचा राग मनात धरून सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास बबन चव्हाण, राजेभाऊ चव्हाण, भाऊ सचिन चव्हाण आणि इतर तिघांनी राठोड कुटुंबियांच्या घरी जाऊन भांडण केले. यावेळी आई अनिता राठोड हिच्या पोटावर हत्याराने वार करून डोक्यात लाकडाने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, राठोड यांच्या घरातील आरडाओरड ऐकून शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या अनिता चव्हाण हिला रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टराने तिला मयत घोषित केले. या घटनेनंतर अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पी.एस.आय.श्रीनिवास सावंत, विठ्ठल केंद्रे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.
तर आरोपी बबन चव्हाण व त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण या दोघांना परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दरम्यान या खून प्रकरणामध्ये आणखी किती आरोपी सहभागी आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button