

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेल्या बंडखोर आमदारांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याचा धडाकाच लावला आहे. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. आता औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यावतीनेदेखील गुरुवारी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या बंडात आमदार संजय शिरसाट यांची भूमिका सुरूवातीपासून महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शिरसाट यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे गटातील बहुसंख्य आमदार मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी बांगर यांची पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावरुन हकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर बांगर यांनी हे शक्तीप्रदर्शन केले. आता आमदार शिरसाट यांचे समर्थकही गुरुवारी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना होणार आहेत. यामध्ये पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व आजी-माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा :