

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सातत्याने वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्र तयार करण्यात आले आहे, त्यामुळे पाण्यालगत असलेली पक्ष्यांची हक्कांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. नाथसागर जलाशयाजवळ झाडांची बेसुमार कत्तल झाल्याने सारंग पक्ष्यांनी (ग्रे हेरॉन) चक्क पाण्यापासून एक किलोमीटर दूर अंतरावर मावसगव्हाण परिसरामध्ये 6 नीलगिरीच्या झाडांवर 26 घरटी बांधली. एकाच झाडावर सारंग पक्ष्यांची बरीच घरटी असणार्या ठिकाणाला 'सारंगागार' असे म्हणतात.
राखी सारंग हा बगळयासारखा दिसणारा, पण राखी धुरकट रंगाचा पक्षी आहे. तो नेहमी उथळ पाणी आणि पाणथळीत आढळतो. संरक्षणाच्या दृष्टीने अनेक पक्षी एकाच ठिकाणी घरटी तयार करून राहतात. पाण्याच्या जवळ असल्याने या पक्ष्यांना पिलांचे खाद्य म्हणजे मासे, खेकडे व इतर जलचर हे खाद्य सारंग पक्ष्यांना आणणे सोपे होते, मात्र परिसरात उंच झाडी नसल्यामुळे या पक्ष्यांनी आता लांब असलेली निलगिरीची उंच झाडे निवडली आणि तेथे घरटी तयार करून यशस्वी प्रजननही केले. सारंग पक्षी मासे व इतर जलचर, तसेच पक्ष्यांची पिले खाऊन अन्नसाखळी अबाधित ठेवतात, तसेच आपल्या विष्ठेद्वारे नैसर्गिक खत झाडे, तसेच पिकांना देत असतात. नाथसागर जलाशायाजवळ झाडांची बेसुमार कत्तल झाल्याने या भागात एखादेच काटेरी झाड दिसते आणि त्यावरही एखाद्याच पक्ष्यांचे घरटे दिसते, गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी नाथसागर परिसरात पाण्याच्या बाजूला बरीच उंच काटेरी झाडे होती, त्यावर विविध प्रकारचे बगळे, सारंग, पाणकावळे आपली घरटी बांधत होते, परंतु सातत्याने अवैध गाळपेरे करण्यासाठी या भागातील झाडे मागील काही वर्षांत तोडली गेली.
अवैध मासेमारी करत जलाशय परिसर उजाड करण्यात आला. नेमकी हीच गोष्ट या प्रजनन करणार्या स्थानिक पक्ष्यांच्या मुळावर उठली होती, परंतु निसर्गचक्र हे चालत असते, काही पक्षी यातून मार्ग काढतात व बदल स्वीकारतात, हे यातून सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत या भागात गाळपेरे आणि अवैध मासेमारी या उपद्रवांमुळे पक्ष्यांची वीण धोक्यात आली असून, पक्ष्यांचे हक्काचे स्थान, अभयारण्य म्हणवल्या जाणार्या नाथसागर परिसरात पक्ष्यांना पोरके व्हावे लागले.
यासंदर्भात माहिती देताना मानद वन्यजीवरक्षक, पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले की, आम्ही मावसगव्हाण परिसरात भटकंती करत असताना नीलगिरी या विदेशी झाडांवर राखी सारंग या स्थानिक पक्ष्यांची घरटी असलेले ठिकाण म्हणजे सारंगागार आढळून आले. सात ते आठ वर्षांनंतर या भागात सारंगागार आढळले. पाण्याजवळ आता घरटी तयार करण्यासाठी जागा नसल्याने या पक्ष्यांनी पाण्यापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर घरटी तयार केली आहेत. माणसांनीही पक्ष्यांना थोडी जागा देणे आवश्यक आहे. वन विभागानेही सभोवताली असणार्या झाडांचे रक्षण करणे, तसेच पाण्याजवळ वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.