‘ओप्पो’ला दणका! ४,३८९ कोटींची सीमा शुल्क चोरी पकडली, DRI ची कारवाई | पुढारी

'ओप्पो'ला दणका! ४,३८९ कोटींची सीमा शुल्क चोरी पकडली, DRI ची कारवाई

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) बुधवारी ओप्पो इंडियाची (Oppo India) सुमारे ४,३८९ कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी शोधून काढली आहे. चिनी कंपन्यांच्या ठिकाणांवर गेल्या काही दिवसांत डीआरआयने छापेमारी केली होती. या कंपनीविरुद्ध चौकशी सुरु आहे. पीआयबीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तपासादरम्यान डीआरआयने ओप्पो इंडियाच्या कार्यालय परिसरात आणि त्याच्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली होती.

“Oppo India ने २,९८१ कोटी रुपयांच्या शुल्क सवलतीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला. या प्रकरणी ओप्पो इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचारी आणि देशांतर्गत पुरवठादारांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्यांनी ओप्पोच्या उत्पादनांच्या आयातीवेळी सीमाशुल्क प्राधिकरणांसमोर चुकीची माहिती दिल्याचे मान्य केले आहे.” असे PIB ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ओप्पो इंडियाने प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी/ब्रँड/आयपीआर परवाना इत्यादी वापरण्याच्या बदल्यात चीनमधील कंपन्यांसह विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘रॉयल्टी’ आणि ‘परवाना शुल्क’ भरण्यासाठी सवलत दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. ओप्पो इंडियाचे संपूर्ण भारतामध्ये उत्पादन, असेंबलिंग (assembling), घाऊक व्यापार, मोबाईल हँडसेट आणि त्यांच्या अॅक्सेसरीजच्या वितरण व्यवसायाचे जाळे आहे. Oppo India Oppo, OnePlus आणि Realme यासह विविध ब्रँडच्या मोबाईल फोनसाठी डील करते.

Back to top button