बुलडाणा : मंत्रीपद, महामंडळ आणि आमदार गायकवाडाच्या बोलण्याचा मतितार्थ! | पुढारी

बुलडाणा : मंत्रीपद, महामंडळ आणि आमदार गायकवाडाच्या बोलण्याचा मतितार्थ!

बुलडाणा : विजय देशमुख : शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड पत्रकार परिषदेत दिलखुलास बोलले. तसे ते आडपडद्याने बोलत नाहीत, जे आहे ते खुल्लमखुल्ला! शिवसेनेतील भुकंपाच्या, अठरा दिवसांच्या घडामोडी आणि शिंदे व फडणवीसांचे नवे संयुक्त सरकार याविषयी भरभरून सांगणे झाल्यावर आमदार गायकवाडांना पत्रकारांनी मंत्रीपदाबाबत विचारल्यावर त्यांनी ज्या सहजपणे सांगीतले की,”..तसा काही विषय नाही, उलट मंत्रीपदाच्या व्यस्तता दौरे -बैठकांमुळे जनतेशी संपर्क कमी होतो” हे असे सांगणे कसलेल्या नेत्यासारखे आहे. याच विधानाचा त्यांनी लगेचच संपर्क कार्यालयापुढे झालेल्या जाहीर सभेतही पुरूच्चार केला. राजकारणात बहुधा पत्ते खुले न करण्याकडेच अनेकांचा कल असतो. पण आ. संजय गायकवाड यांचं ‘जे आहे ते आहे’ या स्वभावाशी सुसंगत असे जर वरचे बोलणे समजले तर त्यांना सध्या मंत्रीपदाची घाई नाही असा अर्थ घ्यावा लागेल. खरंतर कुणीही पदाची महत्वांकाक्षा/अभिलाषा ठेऊनच राजकारण करत असतो. पण आमदार गायकवाडांनी मंत्रीपदाबाबत एवढी समंजस भूमिका मांडणे हे त्यांची राजकीय रेषा उंचावणारी बाब म्हणून अधोरेखित करता येईल.

एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असतानाच आमदार गायकवाडांनी त्यांच्याशी निष्ठा जोडत विश्वास वाढवत बुलडाण्यासाठी कोटी-कोटींचा विकास निधी आणला आहे. आता तर एकनाथजी मुख्यमंत्री झाले आहेत. गायकवाड यांचा आत्मविश्वास अधिकच वाढणे स्वाभाविक आहे. काल त्यांची देहबोलीही तेच दर्शवित होती. मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन समोर आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ, अनुभवी अनेक आमदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची मागणी करून मुख्यमंत्र्यांपुढे पेच वाढवायचा नाही. असा उदात्त हेतू ठेवला असेल तर मतदारसंघासाठी मंत्रीपदाच्या तुलनेत कैकपट मोठे लाभ मिळवण्याचे हे व्यवहार्य शहाणपण आहे, असेच म्हणावे लागेल!

आमदारकीची पहिलीच टर्म पाहता आपल्याला मंत्रीपदाची संधी ही अगदीच धूसर किंवा नसल्यागत आहे. हा वस्तूनिष्ठ अंदाज आला असावा. यामुळेच त्यांनी मंत्रीपदाबाबत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा तूर्त वाढू दिलेल्या नाहीत. जाहीर सभेतही त्याबाबत प्रांजळपणे सांगून मानसिकता तयार केली आणि या अनुषंगाने होऊ शकणाऱ्या अनाठायी चर्चांना सुरूवात होण्यापूर्वीच विराम दिला असे म्हणता येईल.
पत्रकार परिषदेत बोलण्याच्या ओघात आमदार गायकवाड चपखलपणे म्हणाले,”…मी हलके-फुलके महामंडळ थोडीच घेईल, याआधी काही जण टमरेल घेऊन मिरवले आहेत! ”

हे वाक्य खूप महत्वाचे आहे. मंत्रीपदाबाबत अभिलाषा नसल्याचे सांगताना ..त्यामुळे संपर्क वगैरे कमी होतो असा युक्तीवाद करणारे आ. गायकवाड महामंडळाबाबत मात्र थोडके बोलले. तात्पर्य त्यांना वजनदार महामंडळ चालेल असाच त्याचा अर्थ घेता येईल. आ. गायकवाड महामंडळाबाबत बोलताना ‘टमरेल’या शब्दाचा उल्लेख येऊन गेला. यातून कुणाला चिमटा तर काढला गेला नाही? यापूर्वी ‘ओसाड गावची पाटीलकी’काही काळ सांभाळून तिला लाथ मारल्याच्या त्यागाचे कवित्व अजूनही चघळले जाण्याची उदाहरणे आहेत. आ. गायकवाडांनी अचूक वाग्बाण सोडला, असा त्याचा अर्थ घेता येईल.

Back to top button