नगर अर्बन बँकेसमोर खातेधारकांचे उपोषण | पुढारी

नगर अर्बन बँकेसमोर खातेधारकांचे उपोषण

नगर : पुढारी वृत्तसेवा : बँकेकडील ठेवीच्या रकमा व्याज व खर्चासह परत मिळण्याच्या मागणीसाठी कर्जत व मिरजगाव येथील खातेधारकांनी मंगळवारी (दि. 5) नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी लावलेले आर्थिक निर्बंध पुन्हा वाढविल्याने खातेधारकांनी उपोषण सुरू केले आहे.

नगर अर्बन बँकेची शाखा कर्जत आणि मिरजगाव येथे असून, या शाखांवर दि. 6 डिसेंबर 2021 पासून रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लावलेले असल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, निर्बंधाचा कालावधी आता संपुष्टात आला असून, बँकेचे चेअरमन, पदाधिकारी व कर्मचारी यांनी कालावधीत कर्जवसुली केली नसल्याने रिझर्व्ह बँकेने पुढील 3 महिन्यांसाठी निर्बंध वाढविण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्बंधामुळे बँकेत ठेवी अडकल्या असून, खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खातेदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी वारंवार तोंडी व लेखी मागणी केली आहे. या प्रकरणात रिझर्व्ह बँकेकडून दोषी पदाधिकारी, कर्मचारी तसेच थकबाकीदार यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसून, बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या संगनमताने सदर प्रकरणात जबाबदारी टाळण्यासाठी विलंब केला जात असल्याचा आरोप खातेधारकांनी केला आहे. महेश जेवरे, कल्याण काळे, प्रफुल्ल जेवरे, अशोक सुपेकर, कल्पेश कोठारी, सचिन भंडारी, स्पप्नील पितळे, संदीप सुपेकर, प्रतापकुमार शहा, भाऊसाहेब पठारे, जयदीप तापकीर आदी खातेधारकांनी हे उपोषण सुरू केले आहे.

Back to top button