ज्याने शिवसेना सोडली, त्याला जनतेने सोडले...! हिंगोली शिवसेनेचा इतिहास भारी | पुढारी

ज्याने शिवसेना सोडली, त्याला जनतेने सोडले...! हिंगोली शिवसेनेचा इतिहास भारी

हिंगोली, गजानन लोंढे : एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेतील यापुर्वी झालेल्या बंडाचा इतिहास पुन्हा चर्चिल्या जात आहेत. हिंगोली जिल्हा होण्यापुर्वी तथा हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर शिवसेनेच्या तिकीटावर जे निवडून आले, त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवरचा इतिहास आहे. शिवसेना सोडण्याचा विचार करणार्‍या नेत्यांना पुर्नविचार करावा लागतो.

राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठी बंडाळी म्हणून शिंदे यांच्या बंडाचा उल्‍लेख होतो आहे. यापुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांच्या बंडानंतर शिवसेना पुन्हा उभी राहिली. आता पुन्हा शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतो आहे. असे असताना हिंगोलीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनेक नेत्यांना नंतर मात्र यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

१९९० च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत विलास गुंडेवार हे हिंगोलीचे पहिले शिवसेनेचे खासदार निवडून आले. केंद्रात नरसिंहराव यांचे सरकार असताना स्व. गुंडेवार यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत गुंडेवार यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले. परंतू त्यांचा पराभव झाला. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. शिवाजी माने हे शिवसेनेकडून निवडून आले. पुन्हा १९९९ च्या निवडणुकीत माने शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर त्यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माने यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक कळमनुरी मतदारसंघातून लढविली. तेथेही त्यांचा पराभव झाला. शिवसेना सोडल्यानंतर माने यांच्यावर विजयाचा गुलाल पडलाच नाही. १९९१ च्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीत मारोती शिंदे हे शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. परंतु, तेही छगन भुजबळ यांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. शिंदे हे शेवटी राजकीय विजनवासात गेले.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा सुभाष वानखेडे यांनी पराभव केला. शिवसेनेकडून निवडून आलेल्या वानखेडे यांनी पुन्हा २०१९ ची निवडणूक काँग्रेसकडून लढविली. त्यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी जवळपास पावणे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव केला.

१९९८, १९९९ व २०१४ चा अपवाद वगळता हिंगोली लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारा उमेदवार पुन्हा जनतेने स्वीकारला नसल्याचे दिसून येते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेची पुरती वाताहात झाली असताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र मातोश्रीशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे सर्वसामान्य शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे. बांगर यांनी एकपक्ष, एकनेता या तत्वाला बांधिल असल्याचे सांगत शिवसेनेची सत्ता हिंगोलीत अबाधित ठेवण्याचा विडा उचलला आहे.

Back to top button